ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे मत

प्रमुख खेळाडूंविना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत नामोहरम करून मालिका जिंकण्याची यापेक्षा चांगली संधी भारतीय क्रिकेट संघाला मिळूच शकत नाही, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी शुक्रवारी व्यक्त केली. ६ डिसेंबरपासून अ‍ॅडलेड येथे भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेत भारताला विजय मिळवण्याची सर्वाधिक संधी आहे, असे जोन्स यांना वाटते.

ते म्हणाले, ‘‘चेंडू फेरफारप्रकरणी दोषी आढळल्यामुळे एक वर्षांच्या निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाची बाजू नक्कीच कमकुवत झाली आहे. त्याशिवाय कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियापेक्षा सर्वच आघाडय़ांवर वरचढ असून त्यांच्याकडे गोलंदाजांची उत्तम फळी या वेळी उपलब्ध आहे.’’

‘‘ऑस्ट्रेलियाकडे सामना जिंकण्याची कुवत नसल्यामुळे ही मालिका भारतच २-० किंवा ३-० अशा फरकाने खिशात टाकेल, असे मला वाटते. खरे तर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानावर पराभूत करणे अवघड आहे. मात्र यंदा ते भारताला शक्य होईल. स्मिथ व वॉर्नरच संघाच्या धावसंख्येतील ४० टक्के धावा बनवायचे, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत अशी कामगिरी कोण करणार?’’ असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

कोहलीच्या खेळात चुका शोधणे म्हणजे त्याचा अपमान!

भारताचा कर्णधार कोहलीला रोखण्यासाठी कोणती खास रणनीती कांगारूंनी अमलात आणावी, याविषयी विचारले असता जोन्स म्हणाले, ‘‘कोहलीच्या खेळात चुका शोधणे म्हणजे मोनालिसा यांच्या सुप्रसिद्ध चित्रात त्रुटी शोधण्यासारखे आहे. तो विश्वातील अव्वल दर्जाचा फलंदाज असून त्याच्या फलंदाजीत चुका काढणे हे त्याचाच अपमान करण्यासारखे आहे. कोहलीला तुम्ही डिवचले तर चांगलेच महागात पडेल. त्यामुळे त्याचा मित्र बनून राहा. त्याच्या कव्हर ड्राइव्ह, फ्लिकसारख्या फटक्यांना आळा घालण्यासाठी विविध क्षेत्रांत गोलंदाजी करणे, हाच त्याला रोखण्याचा पर्याय असू शकतो.’’

१९८६ मध्ये भारत दौऱ्यावर जाताना ऑस्ट्रेलियाचा संघही अननुभवी होता. पण अ‍ॅलन बॉर्डर आणि बॉब सिम्पसन या दोन महान खेळाडूंनी हा दौरा गाजवला. बॉर्डर आणि सिम्पसन प्रत्येक खेळाडूशी वैयक्तिकपणे चर्चा करत होते. त्यामुळे खेळाडूंच्या मनात प्रतिस्पध्र्यांची भीती राहिली नव्हती. त्यामुळेच आम्ही चांगली कामगिरी करू शकलो.     – डीन जोन्स, माजी खेळाडू