अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियवर वर्चस्व गाजवलं. दोन्ही डावांत भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करत कांगारुंचा डाव झटपट गुंडाळला. भारतीय संघाकडून दोन्ही डावांत बुमराह आणि आश्विन यांनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ केलाच, परंतू पदार्पणाचा कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनेही आपली छाप पाडली. दोन्ही डावांत मिळून सिराजने ५ बळी घेत स्वतःला सिद्ध केलं.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना मोहम्मद सिराजच्या वडिलांचं भारतात अल्पशा आजाराने निधन झालं. भारताकडून क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन देणारा आधारवड हरपल्यामुळे सिराजवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. परंतू यातून सावरत त्याने भारतीय संघासोबत राहून वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. आपल्याला मिळालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याने आश्वासक मारा करत स्वतःची निवड सार्थ ठरवली.

आणखी वाचा- बॉक्सिंग डे कसोटीत अश्विननं रचला इतिहास; मुरलीधरनचा मोठा विक्रम मोडला

दरम्यान या सामन्यात सिराजने अनोखा विक्रम आपल्या नावे केला आहे. कसोटी पदार्पणात गोलंदाजीची सुरुवात न करताही सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सिराज आता दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. याचसोबत बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पण करुन ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेणारा सिराज पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे.

आणखी वाचा- ३१ वर्षांनंतर भारतीय गोलंदाजांसमोर कांगारुंनी नांगी टाकली; भारताने केली या संघाच्या विक्रमाशी बरोबर

पहिल्या डावात कॅमरुन ग्रीन आणि लाबुशेन यांना माघारी धाडणाऱ्या सिराजने दुसऱ्या डावात ट्रॅविस हेड, कॅमरुन ग्रीन आणि लियॉनला माघारी धाडलं.