पुढील दोन वर्षांत होणाऱ्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धाच्या आयोजनाविषयीचा निर्णय घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कार्यकारी मंडळाची शुक्रवारी बैठक होणार आहे. दूरचित्रसंवादाद्वारे होणाऱ्या या बैठकीत २०२१च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या यजमानपदासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया उत्सुक आहेत.

या बैठकीला ‘बीसीसीआय’चा अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह तसेच ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’चे ईर्ल एडिंग्ज आणि निक हॉकले हे उपस्थित राहणार असून २०२१ व २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाविषयी ते आपले म्हणणे मांडतील.

‘‘पुढील वर्षी न्यूझीलंडमध्ये होणारी महिलांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा तसेच पुरुषांच्या दोन ट्वेन्टी-२० विश्वचषकांच्या आयोजनाविषयी या बैठकीत चर्चा होणार आहे. याशिवाय काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे,’’ असे ‘आयसीसी’च्या पदाधिकाऱ्याने सांगितले.

ऑस्ट्रेलियातील ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्यामुळे ते २०२१साठी आग्रही आहेत. त्यामुळे भारताला २०२१ऐवजी २०२२च्या ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद मिळू शकते. परंतु २०२३मध्ये होणारी एकदिवसीय प्रकाराची विश्वचषक स्पर्धा एकच वर्षांच्या अंतराने असल्यामुळे भारतसुद्धा पूर्वनियोजित योजनेनुसार पुढील वर्षीच्या यजमानपदासाठी उत्सुक आहे.