दक्षिण आफ्रिकेचा दुखापतग्रस्त वेगवान गोलंदाज डेल स्टेनने सोमवारी काही काळ नेट्समध्ये गोलंदाजी केली. त्यामुळे भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत स्टेनच्या खेळण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. मात्र स्टेनच्या खेळण्याबाबत अद्याप कोणतेही धोरण निश्चित झालेले नाही, असे त्याचा सहकारी वेगवान गोलंदाज मॉर्नी मॉर्केलने सांगितले.
‘‘सकाळी डेलने गोलंदाजीचा सराव केला. त्याला गोलंदाजी करताना पाहणे, हा आमच्यासाठी सुखद अनुभव ठरला. त्याच्या गोलंदाजीचे निरीक्षण सुरू असून बुधवारी सकाळी ९ वाजताच त्याच्याबाबत निर्णय कळू शकेल,’’ असे मॉर्केलने सांगितले.
स्टेनच्या खेळण्याबाबतचा निर्णय वैद्यकीय मंडळीच घेऊ शकतील, असे मॉर्केलने स्पष्ट केले. पाच वर्षांपूर्वी जामठाच्या याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेने भारताला हरवले होते, त्या सामन्यात स्टेनने १० बळी घेण्याची किमया साधली होती.
मोहाली कसोटीतील पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ ०-१ असा पिछाडीवर आहे. याबाबत मॉर्केल म्हणाला, ‘‘जागतिक क्रिकेटमध्ये कसोटीतील अव्वल स्थान आमच्याकडे आहे. ड्रेसिंग रूममधील वातावरण अतिशय सकारात्मक आहे. पहिल्या कसोटीचा निकाल आमच्या बाजूने लागला नाही; परंतु बुधवारी आम्ही नव्याने या मालिकेकडे पाहणार आहोत. मैदानावर चांगली कामगिरी बजावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’
‘‘जामठाच्या व्हीसीए स्टेडियमवर अनेक चांगल्या आठवणी आमच्यासोबत आहेत. २०१० मध्ये येथे आफ्रिकेने डावाने विजय मिळवला होता,’’ असे त्याने पुढे सांगितले.