ज्येष्ठ क्रिकेटपटू व खासदार महंमद अझरुद्दीन यांना मॅचफिक्सिंग प्रकरणी आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने तहहयात बंदीची कारवाई स्थगित केली असली तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने त्याला निदरेष ठरविण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय घेतलेला नाही. किंबहुना याबाबत मंडळाच्या कार्यकारिणीत मतभेद निर्माण झाले असल्याचे समजते.
मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अझरुद्दीनबाबत कार्यकारिणीत एकमत झालेले नाही. उच्च न्यायालयाने त्यांच्यावरील बंदीस स्थगिती दिली असली तरी मंडळाची कायदेशीर सल्लागारांची समिती या निर्णयाचा बारकाईने अभ्यास करीत आहे. त्यांच्याकडून अहवाल आल्यानंतरच कार्यकारिणीत हा विषय घेतला जाईल. त्यामुळे अझरुद्दीनबाबत थोडासा कालावधी लागणार आहे.
दरम्यान मंडळाने आणखी ५० खेळाडूंना गौरवनिधीचा लाभ देण्याचे ठरविले आहे. या खेळाडूंना एकूण १०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.