राष्ट्रकुल क्रीडा महासंघ (सीजीएफ) आणि आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा महासंघ (आयएसएसएफ) यांच्यात होणाऱ्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतरच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याच्या निर्णयाबाबत भारतीय ऑलिम्पिक संघटना सर्वसाधारण सभेत निर्णय घेईल, असे स्पष्टीकरण संघटनेचे अध्यक्ष नरेंदर बत्रा यांनी शनिवारी केले.

नेमबाजीला हद्दपार केल्यामुळे २०२२मध्ये बर्मिगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून बहिष्कार टाकण्याचा प्रस्ताव जुलै महिन्यात बत्रा यांनीच सादर केला होता. मात्र महिन्याच्या पूर्वार्धात राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बत्रा यांची चर्चा झाली. आता ‘सीजीएल’ आणि ‘आयएसएसएफ’ यांच्यातील आगामी बैठकीनंतर ‘आयओए’च्या सर्वसाधारण सभेत याबाबतचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बत्रा यांनी दिली.

‘‘म्युनिच येथे ७ डिसेंबर रोजी ‘सीजीएफ’ आणि ‘आयएसएसएफ’ यांच्यात बैठक होणार आहे. आंतरराष्ट्रीय संघटनेतर्फे घेतल्या जाणाऱ्या अन्य स्पर्धेतील नेमबाजांनी मिळवलेल्या पदकांची नोंद घेत राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये भारताच्या पदकतालिकेत त्यांची गणना करण्यात यावी, असा प्रस्तावही आम्ही त्यांच्यापुढे सादर केला आहे. त्यामुळे आता या बैठकीपर्यंत थांबण्यावाचून आमच्याकडे पर्याय नाही,’’ असे बत्रा यांनी सांगितले.

‘‘तुर्तास राष्ट्रकुलमधून बहिष्कार टाकण्याच्या निर्णयावर आम्ही कायम असलो तरी सर्वसाधारण सभा होईपर्यंत आम्हाला त्याची मान्यता मिळणे कठीण आहे. त्यामुळे बैठकीनंतरच आम्ही पुढील योजना आखू,’’ असेही बत्रा यांनी सांगितले. टोक्यो ऑलिम्पिकसाठी आतापर्यंत १५ नेमबाजांनी स्थान पक्के केल्यामुळे भारत एकूण १२५ खेळाडूंचे पथक पाठवू शकतो, असेही बत्रा यांनी सांगितले.