06 March 2021

News Flash

कॅरेबियन युवाशक्तीचा करिश्मा!

चौथ्यांदा जगज्जेतेपद जिंकण्यात भारताला अपयश

| February 15, 2016 03:31 am

वेस्ट इंडिजचा संघ पहिल्यावहिल्या जगज्जेतेपदासह आनंद साजरा करताना.

चौथ्यांदा जगज्जेतेपद जिंकण्यात भारताला अपयश; मुंबईकर सर्फराझ खानची एकाकी झुंज
युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषकावर चौथ्यांदा नाव कोरण्याचे भारताचे स्वप्न रविवारी धुळीस मिळाले. अखेरच्या षटकापर्यंत उत्कंठा वाढवणाऱ्या अंतिम सामन्यात वेस्ट इंडिज संघाने राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखालील भारताचा पाच विकेट्स राखून पराभव केला. मानधनाच्या प्रश्नावरून वेस्ट इंडिजचा वरिष्ठ संघ क्रिकेट मंडळाशी झगडत असताना युवाशक्तीने प्रथमच युवा विश्वचषक जिंकून देशवासीयांना दिलासा दिला आहे.
हिरव्यागार खेळपट्टीवर वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. मात्र विंडीजच्या माऱ्यापुढे भारतचा डाव ४५.१ षटकांत १४५ धावांत आटोपला. सर्फराझ खानने ८९ चेंडूंत ५१ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. प्रत्युत्तरादाखल विंडीजने हे आव्हान ४९.३ षटकांत गाठले.
अतिशय दडपणाखाली शांतचित्ताने खेळत संघाला विजय मिळवून देणारी केसी कार्टी (१२५ चेंडूंत नाबाद ५२ धावा) आणि किमो पॉल (६८ चेंडूंत नाबाद ४० धावा) ही जोडी वेस्ट इंडिजच्या विजयाची शिल्पकार ठरली. विंडीजची सुरुवातसुद्धा चांगली झाली नाही. गिफ्रॉन पोप (३) आणि टेव्हिन इमलॅच (१५) ही सलामीवीर जोडी संघाच्या २८ धावा झाल्या असताना माघारी परतली. मग कर्णधार शिम्रॉन हेटमायर (२३) आणि कार्टी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी करून संघाला स्थैर्य मिळवून दिले. डावखुरा फिरकी गोलंदाज मयांक डागरने हेटमायरचा अडसर दूर करून भारताच्या आशा उंचावल्या. मग शामर प्रिंगर (३) फार काळ खेळपट्टीवर टिकाव धरू शकला नाही. डागरनेच त्याला तंबूची वाट दाखवली. हे दोन्ही झेल अरमान जाफरने घेतले. मात्र कार्टी आणि पॉल यांनी सहाव्या विकेटसाठी ६९ धावांची नाबाद भागीदारी करून विंडीजच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताच्या डागरने २५ धावांत ३ बळी घेतले.
त्याआधी, आतापर्यंत अपराजित राहणाऱ्या भारतीय फलंदाजांनी अंतिम सामन्यात हाराकिरी पत्करली. मुंबईकर फलंदाज सर्फराझने भारताचा डाव सावरण्याचा एकाकी प्रयत्न केला. अन्यथा भारताला शतकी आकडासुद्धा गाठता नसता. युवा विश्वचषकामध्ये सर्वाधिक सात अर्धशतके झळकावण्याचा विक्रम त्याने नोंदवला. सर्फराझने ८९ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह ५१ धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून अल्झारी जोसेफ आणि रयान जॉन यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले, तर भारताच्या १४५ धावसंख्येतील महत्त्वाचे योगदान २३ अवांतर धावांचे होते.

संक्षिप्त धावफलक
भारत : ४५.१ षटकांत सर्व बाद १४५ (सर्फराझ खान ५१; अल्झारी जोसेफ ३/३९, रयान जॉन ३/३८) पराभूत वि. वेस्ट इंडिज : ४९.३ षटकांत ५ बाद १४६ (केसी कार्टी नाबाद ५२, किमो पॉल नाबाद ४०, शिम्रॉन हेटमायर २३; मयांक डागर ३/२५)
सामनावीर : केसी कार्टी (विंडीज)
मालिकावीर : मेहंदी हसन.

प्रथम फलंदाजी करणे अवघड होते. गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. प्रारंभी आमचे क्षेत्ररक्षणही चांगले झाले. मात्र सोडलेले झेल आणि निसटलेल्या धावा यांची भूमिका महत्त्वाची ठरली.
– इशान किशन, भारताचा कर्णधार

माझ्या आनंदाला पारावार नाही. हा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. युवा विश्वविजेतेपद आम्ही जिंकू, असे कुणालाही वाटले नव्हते; परंतु वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी हे यश मिळवून दाखवले.
– शिम्रॉन हेटमेयर, वेस्ट इंडिजचा कर्णधार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 15, 2016 3:31 am

Web Title: decoding the west indies under 19 success story
Next Stories
1 चैन सिंगची सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक
2 सायनाच्या अनुपस्थितीत भारताचा मार्ग खडतर
3 पुण्याची विजयाची बोहनी
Just Now!
X