आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी जिम्नॅस्टिक्सपटू दीपा कर्माकरने उडी मारताना स्वत:ला मोठी दुखापत होणार नाही, या भयभित करणाऱ्या विचारावर विजय मिळवणे अत्यावश्यक आहे, अशी प्रतिक्रिया तिचे प्रशिक्षक बिस्वेश्वर नंदी यांनी दिली.

रिओ ऑलिम्पिकमध्ये व्हॉल्ट प्रोडुनोव्हा क्रीडा प्रकारात चौथ्या स्थानावर समाधान मानणारी २४ वर्षीय दीपाने त्यानंतर कोणत्याही प्रमुख स्पर्धामध्ये भाग घेतलेला नाही. दीपावर गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात गुडघ्याची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यातून ती पूर्णपणे सावरलेली नसली तरी आशियाई स्पर्धेपूर्वी ती तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.

‘‘ती सध्या ९० टक्के तंदुरुस्त आहे, असे मला वाटते. पुढील महिन्यापासून ती जोमाने सरावाला प्रारंभ करेल,’’ असे नंदी म्हणाले. नंदीच्या आदेशानुसार दीपाने यंदा पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेतली होती. मात्र, आशियाई स्पर्धेत तिच्यासमोर राष्ट्रकुलच्या तुलनेत कठीण आव्हान असणार आहे.

‘‘तिच्यासमोर चीन, जपान आणि दोन कोरियाच्या खेळाडूंचे आव्हान असणार आहे. ते सर्व ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. त्यामुळे दीपा पदक जिंकेल किंवा नाही, हे मी सांगू शकत नाही. पण त्यासाठी तिने पुन्हा जायबंदी होण्याच्या भीतीकडे कानाडोळा केला पाहिजे. झालेल्या दुखापतीला विसरणे सोपे नाही हे एक प्रशिक्षक म्हणून मला ठाउक आहे. यामुळे तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही. मात्र, तरीही तुम्हाला त्यावर तोडगा काढता आला पाहिजे,’’ असे नंदी म्हणाले.