रिओ ऑलिम्पिक स्पध्रेतील प्रुदुनोवा जिम्नॅस्टिक प्रकारच्या अंतिम फेरीत चौथ्या स्थानावर मजल मारणारी भारताची दीपा कर्माकर आगामी राष्ट्रकुल क्रीडा स्पध्रेत सहभागी होणार नसल्याचे संकेत तिचे प्रशिक्षक बिश्वेश्वर नंदी यांनी दिले आहेत.

गतवर्षी एप्रिल महिन्यात तिच्यावर शस्त्रक्रिया झाली होती आणि त्यातून ती पूर्णपणे बरी झाली नसल्याचे नंदी यांनी सांगितले. ‘‘दीपा अद्यापही पूर्णपणे तंदुरुस्त झालेली नाही. कदाचित तिला आणखी काही काळ लागेल. तिच्या दुखापतीबाबत  कोणताही धोका पत्करायचा नाही. आशियाई स्पर्धा हे आमचे लक्ष्य आहे,’’ असे नंदी यांनी स्पष्ट केले.

दीपाला गतवर्षी आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद स्पध्रेतूनही माघार घ्यावी लागली होती. ‘‘ खेळाडू म्हणून  या वळणावरून जावे लागतेच. ही परिस्थिती ती योग्य रीतीने हाताळत आहे आणि ती दमदार पुनरागमन करेल,’’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.