रिओ पॅरालिम्पिकमध्ये भारताची गोळाफेकपटू दीपा मलिकने ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. दीपाने गोळाफेकमध्ये रौप्य पदक मिळविले. पॅरालिम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणारी दीपा पहिली महिला खेळाडू ठरली आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय महिला खेळाडूने पॅरालिम्पिकमध्ये अशी उल्लेखनीय कामगिरी बजावलेली नाही.
दीपा मालिकने सहा प्रयत्नात ४.६१ मीटर अंतरावर गोळा फेकून रौप्य पदक जिंकले. तिच्यापेक्षा अधिक अंतरावर गोळा फेकणाऱ्या बहरिनच्या फतेमा नदीम गोळाफेक प्रकारात अव्वल राहिली. तिने ४.७६ मीटर अंतरावर गोळा फेकत सुवर्णावर कब्जा केला. तर ग्रीसच्या दिमीत्रा कोरोकिडाने ४.२८ मीटर गोळा फेकत कास्य पदक पटकाविले. दीपा मलिक ही सेना अधिकाऱ्याची पत्नी असून ती दोन मुलांची आई देखील आहे. गोळाफेक व्यतिरिक्त दीपाने भालाफेक , मोटार शर्यत आणि पोहणे या प्रकारात सहभाग घेतला होता. १७ वर्षापूर्वी मणक्याच्या कर्करोगाने त्रस्त झालेल्या दीपाच्या कमरेखालील भाग निष्क्रीय आहे. मात्र, आपल्या खेळातील यशाने तिने अपंगत्वावर मात केली. मार्च २०१६ मध्ये दुबईमध्ये झालेल्या आशियाई ओशियन स्पर्धेत दीपाने भालाफेकमध्ये सुवर्ण तर गोळाफेकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. खेळातील तिच्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल तिला भारत सरकारने अर्जून पुरस्काराने सन्मानित केले आहे. मैदानात स्थैर्यासाठी ती चाकांच्या खुर्चीचा आधार घेते. दीपाच्या ऐतिहासिक पदकासोबत पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आता एकूण तीन पदके जमा झाली आहेत.
यापूर्वी उंच उडी प्रकारात मरियप्पन थंगवेलू याने सुवर्ण तर वरूण भाटीनेही याच प्रकारात कांस्य पदक पटकावत भारताचे पदकाचे खाते उघडले होते. पॅरालिम्पिकमध्ये भारताने तब्बल १२ वर्षांनंतर सुवर्णपदक पटकावले होते. १८ सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या पॅरालिम्पिकमध्ये दोन शरणार्थींसह ४ हजार ३४४ खेळाडू सहभागी झाले आहेत. जगातील १५४ देशांमध्ये या खेळांचे थेट प्रसारण केले जात आहे. पॅरालिम्पिकची सुरूवात १९४८ मध्ये झाली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 12, 2016 9:45 pm