बांगलादेशविरुद्ध तिसऱ्या टी-२० सामन्यात हॅटट्रीकसह ६ बळींची नोंद करणाऱ्या दीपक चहरचा धडाकेबाज फॉर्म सुरुच आहे. रविवारी भारताकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळल्यानंतर, दीपक चहर आपल्या राजस्थान संघाकडून सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत मैदानात उतरला. त्रिवेंद्रम येथील सामन्यात दीपक चहरने विदर्भाविरुद्ध खेळताना हॅटट्रीकची नोंद केली आहे.

नाणेफेक जिंकून विदर्भाचा कर्णधार फैज फजलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना १३ षटकांचा करण्यात आला. राजस्थानच्या गोलंदाजांसमोर विदर्भाची फलंदाजी पुरती ढेपाळली. दिपक चहरने तेराव्या षटकात विदर्भाच्या दर्शन नळकांडे, अक्षय वाडकर आणि यश ठाकूर यांना माघारी धाडत हॅटट्रीकची नोंद केली. गेल्या ३ दिवसांमधली दीपक चहरची ही दुसरी हॅटट्रीक ठरली आहे. विदर्भाने १३ षटकांमध्ये ९९ धावांपर्यंत मजल मारली. दीपक चहरने ३ षटकांत १८ धावा देत ४ बळी घेतले.