आई-वडिलांचे छत्र ऐन उमेदीत हरपल्यानंतर दीपक निवास हुडाने सतराव्या वर्षी समर्थपणे कुटुंबाचा सांभाळ केला. शास्त्र शाखेतून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर वैद्यकीय आणि इंजिनीअरिंगचे पर्याय त्याच्यापुढे उपलब्ध होते. मात्र कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी दीपकने शिक्षण अर्धवट सोडले आणि नोकरी पत्करली. याच कालखंडात कबड्डी या खेळाची संजीवनी त्याला मिळाली. २०१२ मध्ये झालेल्या प्रो कबड्डी लीगच्या लिलावात राकेश कुमारनंतर दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च बोली (१२ लाख ६० हजार) ही दीपकवर लागली आणि तेलुगू टायटन्सच्या संघात तो सामील झाला. यंदाच्या तिसऱ्या हंगामात पुणेरी पलटणकडून खेळणाऱ्या दीपकची कहाणी ही रोचक अशीच आहे.
दीपक हरयाणाच्या रोहटक जिल्ह्य़ातील चमारिया गावचा. वयाच्या चौथ्या वर्षी दीपकच्या आईने जगाचा निरोप घेतला. त्यानंतर वडिलांनी शेती करून दोन मुलांना वाढवले. मात्र दीपक १७ वर्षांचा असताना वडिलांचेही आकस्मिक निधन झाले. हुडा कुटुंबावर आभाळ कोसळले होते. दीपक शिक्षणात अतिशय हुशार होता. त्याला दहावी, अकरावी आणि बारावी या प्रत्येक इयत्तेत चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे शाळेतच बदली शिक्षक म्हणून तात्पुरत्या सेवेत ठेवण्यात आले.
शाळेत शिकत असताना दीपकचा एक मित्र कबड्डी खेळायला जायचा. त्याच्यासोबत जाऊन जाऊन दीपकला खेळाचा लळा लागला होता. त्यामुळे आंतरविद्यापीठ स्पध्रेतील सुवर्णपदक विजेत्या संघातून दीपक खेळला होता. पाटणाला झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय स्पध्रेत हरयाणाला विजेतेपद मिळाले होते. त्या संघातही दीपकचा समावेश होता. कबड्डीमुळे जीवनाला स्थैर्य मिळाले आहे. कबड्डीसाठी तो दिवसरात्र मेहनत घेत होता. आधी काही वष्रे लष्करात नोकरी केल्यानंतर आता गेली तीन वष्रे तो एअर इंडियाच्या सेवेत आहे.
प्रो कबड्डीच्या वाटचालीविषयी दीपक म्हणाला, ‘‘प्रो कबड्डीचा प्रवास अतिशय चांगला झाला. आधी खेळाला इतके महत्त्व दिले जात नव्हते. राष्ट्रीय स्पध्रेनंतर भारतीय संघात स्थान मिळवण्याची प्रतीक्षा करावी लागायची. आता सर्वत्र आम्हाला कबड्डीपटू म्हणून ओळखू लागले आहेत.’’
प्रो कबड्डीची संधी कशी मिळाली, हे उलगडताना दीपक म्हणाला, ‘‘२०१४च्या आशियाई क्रीडा स्पध्रेसाठी भारतीय संघाच्या शिबिरासाठी निवडण्यात आलेल्या ३६ संभाव्य चमूत माझा समावेश होता. या सर्व खेळाडूंना प्रो कबड्डीत संधी मिळाली. त्या वेळी मला भारतीय संघात स्थान मिळवण्यात अपयश आले होते, परंतु नुकत्याच झालेल्या दक्षिण आशियाई क्रीडा स्पध्रेत मी भारताकडून खेळलो होतो.’’
‘‘प्रो कबड्डीचा चालू हंगाम संपल्यानंतर अर्धवट राहिलेले शिक्षण मला पूर्ण करायचे आहे. पदव्युत्तर शिक्षण घ्यायची माझी इच्छा आहे. खेळाच्या कारकीर्दीमुळे आता शास्त्र शाखेत ते कठीण असले तरी कला शाखेत मी घेऊ शकेन.’’