दीपाली देशपांडे, भारताची प्रशिक्षक

प्रशांत केणी

भारतीय संघाला मार्गदर्शन करणारे अनुभवी प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नेमबाजांनी सुरू केलेल्या अकादम्या या बळावरच नेमबाजीला सुगीचे दिवस आले आहेत. अनेक युवा नेमबाज आपली छाप पाडत आहेत. येत्या ऑलिम्पिकसाठीसुद्धा भारताचे विक्रमी १५ नेमबाज पात्र ठरले आहेत, असे मत भारताच्या वरिष्ठ नेमबाजी संघाची प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांनी व्यक्त केले आहे. नुकतीच झालेली आशियाई नेमबाजी स्पर्धा आणि ऑलिम्पिकचे आव्हान या पार्श्वभूमीवर देशपांडे यांच्याशी केलेली खास बातचीत-

*  आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेमधील भारताच्या कामगिरीविषयी तुम्ही काय सांगाल?

गेल्या वर्षी झालेल्या विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत भारताने अभूतपूर्व यश मिळवताना एकूण २७ पदके मिळवली होती. याआधी २००६मधील सहा पदके हीच भारताची सर्वोत्तम कामगिरी होती. परंतु २०१८च्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेनंतरच्या प्रत्येक विश्वचषकात भारताची कामगिरी उंचावत गेली आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेतील हे यश अपेक्षितच होते. एअर रायफल, पिस्तूल प्रकारात आपली मक्तेदारी आधीपासूनच होती. परंतु गेल्या काही वर्षांत आपण ५० आणि २५ मीटरमध्येही वर्चस्व गाजवू शकतो, हे सिद्ध केले.

*  आतापर्यंत भारताने ऑलिम्पिकमधील विक्रमी १५ स्थाने निश्चित केली आहेत. यात आणखी भर पडेल काय?

नाही, आता ऑलिम्पिक पात्रतेच्या स्पर्धा संपलेल्या आहेत. भारताचे १५ नेमबाज टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच रायफल आणि पिस्तूलमध्ये मिश्र दुहेरी गटांमध्येही याच खेळाडूंचा सहभाग असेल. ऑलिम्पिक पात्रता मिळवलेल्या अन्य देशांकडे स्थानांची संख्या अतिरिक्त झाली, तर ते आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला सांगून ती कमी करू शकतात. या स्थानांवर सहभागाची संधी भारताला मिळू शकते.

*  ऑलिम्पिकच्या दृष्टिकोनातून सध्याच्या भारताच्या यशाचे तुम्ही कसे विश्लेषण कराल?

ऑलिम्पिकमध्ये नेमबाजांची कामगिरी कशी होईल, याचा विचार करायला आपण पाच-सहा महिने आधी सुरुवात करतो. पण गेल्या दोन वर्षांतील भारताच्या कामगिरीचा आढावा घेतल्यास ऑलिम्पिकमधील कामगिरीचे आशादायी चित्र उभे राहते. गेल्या वर्षी भारताने यश मिळवलेली विश्व अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धा ही ऑलिम्पिकपेक्षाही स्पर्धात्मक असल्याचे मानले जाते. ऑलिम्पिकमध्ये मर्यादित प्रवेश असतो. त्यामुळे सर्व देशांचे सर्वोत्तम नेमबाज तिथे सहभागी होतील, याची खात्री नसते. परंतु विश्व अजिंक्यपद स्पर्धेत सर्व देश आपले सर्वोत्तम नेमबाज तिथे पाठवतात.

*  टोक्यो ऑलिम्पिकमध्ये वातावरणाचा प्रभाव कामगिरीवर पडेल का?

वातावरण हा घटक नेमबाजांच्या कामगिरीसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. परंतु जपान हा आशियाई देश असल्याने वातावरणाचा समान घटक भारतासाठी अनुकूल ठरेल. फक्त आद्र्रता हा मुद्दा असू शकतो. युरोपियन देशांना मात्र टोक्योतील वातावरण आव्हानात्मक ठरेल.

*  ऑलिम्पिकसाठी विशेष तयारी कशा प्रकारे सुरू आहे?

ऑलिम्पिकसाठी टोक्योमध्ये विशेष सराव शिबिरासाठी जाण्याची सप्टेंबरमध्ये योजना होती. परंतु तेथील नेमबाजी केंद्रे तयार नसल्यामुळे ती बारगळली. परंतु जानेवारीत आम्ही टोक्यो दौऱ्यावर जाणार आहोत. त्यानंतर एप्रिलमध्ये ऑलिम्पिक चाचणी नेमबाजी स्पर्धेत आम्ही सहभागी होऊ.

*  नेमबाजीत अनेक युवा खेळाडू उदयास येत आहेत. त्यांच्याविषयी तुम्ही काय सांगाल?

२०१२मध्ये भारतीय नेमबाजी संघटनेने कनिष्ठ आणि युवा वयोगटांमधील खेळाडूंसाठी विशेष कार्यक्रम राबवला. त्यामुळे सौरभ चौधरी, अंजूम मुद्गिल, यशस्विनी देसवाल, मनू भाकर यांसारख्या युवा खेळाडूंची प्रगती झपाटय़ाने झाली. आता प्रशिक्षकांकडेही पुरेसा अनुभव जमा झाल्याने प्रगल्भता आली आहे. या पिढीला ही अनुकूलता लाभली असली, तरी स्पर्धात्मकताही वाढली आहे. याचप्रमाणे गेल्या काही वर्षांत छोटय़ा-छोटय़ा असंख्य नेमबाजीच्या अकादम्या भारतात निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या निष्णात नेमबाजांकडून मार्गदर्शन घेतल्याने त्यांचा पाया मजबूत आहे.

*  नेमबाजीच्या जागतिक नकाशावर भारताची वेगाने प्रगती होते आहे. परंतु महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी काय सांगाल?

मी नेमबाजी करीत असताना महाराष्ट्र जसा आघाडीवर होता, तेच स्थान आता पुन्हा प्राप्त केले आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मधली काही वर्षे संक्रमणाची ठरली. परंतु आता तेजस्विनी सावंत, राही सरनोबत यांच्याकडून ऑलिम्पिक पदकाच्या आशा धरता येतील. याशिवाय स्वप्निल पुसाळे, भक्ती खामकर, शाहू माने, नूपुर पाटील हे नेमबाज महाराष्ट्राची पताका अभिमानाने फडकवत आहेत.