विश्वचषक तिरंदाजी स्पर्धा

टॅन या-टिंगकडून सरळ सेटमध्ये पराभव पत्करल्यामुळे चार वेळा रौप्यपदक विजेत्या दीपिका कुमारीला विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात पहिल्याच फेरीत गारद होण्याची नामुष्की पत्करावी लागली आहे.

स्टॅडिओ डेई मार्मी येथे झालेल्या या सामन्यात जागतिक क्रमवारीत एकेकाळी अव्वलस्थान भूषवणाऱ्या दीपिकाला अपेक्षित प्रतिकार करता आला नाही. त्यामुळे टॅन या-टिंगने ६-० अशा फरकाने तिचा धुव्वा उडवला.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेच्या अंतिम टप्प्यासाठी पात्र ठरणारी दीपिका ही एकमेव भारतीय खेळाडू होती. यंदाच्या वर्षांत झालेल्या चार विश्वचषक स्पर्धापैकी दोन स्पर्धामध्ये तिने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

मागील वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये तैवानच्या टॅन या-टिंगनेच दीपिकाला उपउपांत्यपूर्व फेरीत हरवले होते. पहिल्या सेटमध्ये टॅनने दोनदा १० पैकी १० गुण मिळवण्याची किमया साधली. पहिल्या सेटमध्ये टॅनने १०-९-१० असे गुण मिळवले, तर धिमी सुरुवात करणाऱ्या दीपिकाला ८-९-१० असे गुण मिळवता आले.

दुसऱ्या सेटमध्ये ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या टॅनने ३० पैकी ३० गुण कमावले, तर २५ गुण मिळवणारी दीपिका निरुत्तर झाली. मग तिसऱ्या सेटमध्येही टॅनने २८ गुण मिळवले आणि दीपिकाचे आव्हान संपुष्टात आल्याचे स्पष्ट झाले.