ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमधील एका स्थानाची निश्चिती

बँकॉक : आशियाई तिरंदाजी स्पध्रेतील रीकव्‍‌र्ह प्रकारात गुरुवारी दीपिका कुमारीने सुवर्ण आणि अंकिता भाकटने रौप्यपदकाची कमाई केली. या दोघींनीही पदकांसहित ऑलिम्पिकमधील एका स्थानाची निश्चितीसुद्धा केली आहे.

टोक्यो ऑलिम्पिक पात्रतेची तीन वैयक्तिक स्थाने गुरुवारी निश्चित होणार होती. जागतिक तिरंदाजी महासंघाने भारतीय तिरंदाजी संघटनेवर बंदी घातल्यामुळे भारतीय खेळाडू त्रयस्थ क्रीडापटू म्हणून जागतिक तिरंदाजी संघटनेच्या ध्वजाखाली या स्पध्रेत सहभागी झाले होते. परंतु याही स्थितीत अग्रमानांकित दीपिका आणि सहावी मानांकित अंकिताने लक्षवेधी कामगिरी केली.

महिलांमध्ये जागतिक क्रमवारीत अग्रस्थानावर विराजमान असणाऱ्या दीपिकाने मलेशियाच्या नूर अफिसा अब्दुल हलिला ७-२, इराणच्या झाहरा नेमातीला ६-४ आणि थायलंडच्या नरीसारा खुनहिरनचायोचा ६-२ असा पराभव करून उपांत्य फेरी गाठताना ऑलिम्पिकमधील स्थान पक्के केले.

नरीसाराविरुद्धच्या सामन्यात दीपिकाने आपला आयुष्याचा जोडीदार अतानू दासकडे २८ गुण साधेन, असा दावा केला होता. परंतु तिने एकूण २९ गुण कमावले. यापैकी दोनदा १० आणि एकदा ९ गुण मिळवले. मग दीपिकाने एनग्युऐटला ६-२ अशा फरकाने नामोहरम करीत अंतिम फेरी गाठली. मग अंतिम सामन्यात दीपिकाने अंकिताचा ६-० असा सहज पाडाव केला. अंकिताने हाँगकाँगच्या लॅम शूक चिंग अ‍ॅडाचा ७-१, व्हिएतनामच्या एनग्युयेन थि फुआँगचा ६-०, कझाकस्तानच्या अनास्तासिया बॅन्नोव्हाचा ६-४ आणि भूतानच्या कर्माचा ६-२ असा पाडाव केला.

तरुणदीप राय, अतानू दास आणि प्रवीण जाधव यांचा समावेश असलेल्या पुरुषांच्या रीकव्‍‌र्ह संघाने वर्षांच्या पूर्वार्धात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पध्रेद्वारे ऑलिम्पिकमधील एक स्थान निश्चित केल्यानंतर शुक्रवारी भारताकडून आणखी एक स्थान निश्चित झाले. आता बर्लिनला होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेत ऑलिम्पिक पात्रतेची आणखी एक संधी उपलब्ध असेल.

दिवसाच्या पूर्वार्धात वादळी वारे वाहत होते. त्यामुळे माझ्यावरील दडपण वाढले होते. परंतु मी फक्त माझ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून उत्तम कामगिरी होईल, असे स्वत:ला बजावले. ऑलिम्पिकमधील एक स्थान पक्के करता आल्याने संपूर्ण संघाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आता पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेसाठी सांघिक स्थान पक्के करण्याचे आव्हान आमच्यापुढे आहे.

– दीपिका कुमारी

भारताने आशियाई तिरंदाजी स्पध्रेत एकूण सात पदकांची कमाई करीत दुसरे स्थान मिळवले. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदकांचा समावेश आहे.