टोक्यो : विश्वातील अव्वल क्रमांकाची तिरंदाज दीपिका कुमारीला शुक्रवारी टोक्यो ऑलिम्पिकमधील महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे सलग तिसऱ्या ऑलिम्पिकमध्ये भारताच्या दीपिकाला पदकाविना माघारी परतावे लागणार आहे.

दक्षिण कोरियाच्या २० वर्षीय अ‍ॅन सॅनने दीपिकाचा ६-० (३०-२७, २६-२४, २६-२४) असा सरळ तीन सेटमध्ये धुव्वा उडवून दिमाखात उपांत्य फेरी गाठली. दीपिकाने या फेरीत तब्बल चार वेळा सात गुणांवर निशाणा साधला. त्याउलट सॅनने तीन वेळा पूर्ण १० गुण मिळवले.

तत्पूर्वी, शुक्रवारी पहाटे झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत दीपिकाने रशियाच्या सेनिया पेरोव्हावर ६-५ (२८-२५, २६-२७, २८-२७, २६-२६, २५-२८) अशी शूट-ऑफमध्ये सरशी साधली. शूट-ऑफमध्ये दीपिकाने १० गुणांवर निशाणा साधला, तर पेरोव्हाने अवघे सात गुण कमावले. परंतु उपांत्यपूर्व फेरीत दीपिका पराभूत झाली.

दीपिकाच्या पराभवामुळे तिरंदाजीमध्ये आता फक्त पुरुषांच्या विभागात अतानू दासवर भारताच्या पदकाच्या आशा टिकून आहेत. अतानूचा शनिवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या ताकाहारू फुरुकावाशी मुकाबला होणार आहे.

मी स्वत:च्या अपेक्षेप्रमाणे कामगिरी करण्यात अपयशी ठरली. गेल्या दोन विश्वचषकात उत्तम खेळ करूनही ऑलिम्पिक पदक हुकल्यामुळे मी प्रचंड निराश आहे.

– दीपिका कुमारी