विंडीजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल याने एका ऑस्ट्रेलियाच्या मीडिया कंपनीविरुद्ध मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणी त्या कंपनीने गेलला ३ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स (२ लाख २० हजार डॉलर्स) ची नुकसान भरपाई द्यावी, असे आदेश न्यू साऊथ वेल्सचे सुप्रीम कोर्ट न्यायाधीश लुसी मॅक्कलम यांनी दिले आहेत.

फेअरफॅक्स मीडिया या कंपनीने २०१५च्या विश्वचषक स्पर्धेदरम्यान गेलने अशोभनीय कृत्य केल्याचे वृत्त चालवले होते. त्यामुळे गेलची प्रतिमा डागाळली असे संघात त्याने हा दावा ठोकला होता. यावर सोमवारी न्यायालयाने निकाल जाहीर केला. दरम्यान या निर्णयाविरोधात फेअरफॅक्स मीडिया कंपनी दाद मागणार आहे. असे सांगितले जात आहे.

फेअरफॅक्स मीडियाच्या The Sydney Morning Herald, The Age and The Canberra Times या वृत्तपत्रांनी ख्रिस गेलने सिडनीतील सामन्यात मसाज थेरपिस्टसमोर अशोभनीय वर्तन केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर या प्रकरणी गेलने त्यांच्यावर मानहानीचा दावा ठोकला होता. या प्रकरणी ऑक्टोबर २०१७ चार सदस्यीय ज्युरींनी गेलच्या बाजूने निर्णय दिला होता. आता न्यू साऊथ वेल्स सुप्रीम कोर्टानेही गेलच्या बाजूनेच निर्णय दिला आहे. मीडिया कंपनी आपल्या वृत्ताला दुजोरा देणारा एकही सबळ पुरावा कोर्टासमोर सादर करू शकले नाहीत, त्यामुळे असा निर्णय देण्यात आला आहे.