‘शेवटच्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर मी षटकार मारला. मात्र त्यानंतर दोन चेंडूंवर मी मोठा फटका मारू शकलो नाही. काही वेळेला तुमच्या मनाप्रमाणे फटके जात नाहीत. त्यामुळे पराभवाची जबाबदारी माझी आहे’, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पराभवाची जबाबदारी स्वीकारली.

इंग्लंडविरुद्धच्या एकमेव ट्वेन्टी-२० सामन्यात भारताचा केवळ तीन धावांनी पराभव झाला. विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघ सहज विजय मिळवेल असे चित्र होते. मात्र सातत्याने विकेट्स पडल्याने तसेच इंग्लंडचे गोलंदाज धावा रोखण्यात यशस्वी भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

धोनी पुढे म्हणाला, ‘६ चेंडूत १७ धावा काढणे केव्हाही कठीणच असते. अंबाती रायुडू नुकताच खेळपट्टीवर आला होता. सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजी करणे त्याच्यासाठी नवीन आहे. शेवटच्या षटकात फटकेबाजीची जबाबदारी त्याने निभावली असती मात्र एरव्ही अशा प्रकारच्या परिस्थितीत खेळण्याचा अनुभव माझ्याकडे होता. मात्र रविवारी हा अनुभव कामी आला नाही. त्यामुळे पराभवाची जबाबदारी माझीच आहे’.
गोलंदाजीविषयी विचारले असता धोनी म्हणाला,‘शेवटच्या षटकांमध्ये यॉर्करचा मारा करणे आवश्यक आहे. यामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे’.