अर्जेटिनाचा हॉकी दौरा

भारतीय महिला हॉकी संघाला अर्जेटिना हॉकी दौऱ्यात सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. यजमान अर्जेटिनाने भारतावर २-० अशी सहज सरशी साधत या दौऱ्यातील सलग दुसरा विजय संपादन केला.

भारताने पहिल्या सामन्यात अर्जेटिनाला कडवी लढत दिली होती, पण हा सामनाही भारताने २-३ असा गमावला होता. शुक्रवारी झालेल्या सामन्यात अर्जेटिनाकडून सिल्विना डेलिया (दुसऱ्या मिनिटाला) आणि ऑगस्टिना अल्बर्टारियो (५४व्या मिनिटाला) गोल केले.

अर्जेटिनाच्या आघाडीच्या फळीने सुरुवातीपासूनच भारतावर दडपण आणण्यास सुरुवात केली. दुसऱ्याच मिनिटाला भारताच्या बचावफळीच्या चुकीमुळे यजमानांना पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यावर अनुभवी अर्जेटिना संघाने सिल्विनाच्या गोलमुळे खाते खोलले.

पिछाडीवर पडल्यानंतर भारतीय संघाने अधिक जोशाने खेळ करत प्रतिस्पध्र्याच्या गोलक्षेत्रात हल्ले चढवले. मात्र अर्जेटिनाची बचावफळी भेदण्यात त्यांना वारंवार अपयश येत होते. भारताने पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, पण त्यांच्या पदरी अपयश आले. चौथ्या सत्रातही भारताने चांगला खेळ केला, पण मिळालेल्या संधीचे गोलमध्ये रूपांतर करणे त्यांना जमले नाही.

अखेरीस ५४व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर ऑगस्टिनाने दुसरा गोल नोंदवून अर्जेटिनाचा विजय पक्का केला. आता भारताची अर्जेटिनाविरुद्धची पुढची लढत शनिवारी रंगणार आहे.

मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही तर काय होते, हे आजच्या कामगिरीने भारतीय महिला हॉकीपटूंना शिकता आले. आम्ही खूप चांगला खेळ केला. त्यामुळेच किमान पहिल्या दोन सत्रांत प्रतिस्पध्र्याच्या गोलक्षेत्रात मजल मारून गोल करण्याची संधी आम्हाला निर्माण करता आल्या.

– शोर्ड मरिन, भारतीय संघाचे प्रशिक्षक