कडवे आव्हान उभे करणारे मुंबई क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आशीष शेलार यांना भारतीय बॉक्सिंग महासंघाच्या (बीएफआय) अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभवाचा धक्का बसला. विद्यमान अध्यक्ष अजय सिंह सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान झाले.

स्पाइसजेट एअरलाइन्सचे अध्यक्ष असलेल्या अजय सिंह यांनी गुरुग्राम येथे बुधवारी झालेल्या निवडणुकीत शेलार यांच्यावर ३७-२७ अशा फरकाने मात केली. सिंह यांच्याच गटाच्या आसामच्या हेमंत कुमार कलिता यांची सरचिटणीसपदी तर गोव्याच्या दानुष्का दीगामा यांची सहसचिवपदी निवड झाली. विद्यमान सरचिटणीस जय कवळी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उभे न राहता शेलार यांना पाठिंबा दर्शवला होता.

‘‘किती फरकाने मी निवडून आलो हे महत्त्वाचे नसून महासंघाच्या सदस्यांनी माझ्यावर विश्वास दाखवल्याने मी आनंदी आहे. बॉक्सिंग हा खेळ पुढे नेण्यासाठी तसेच माझ्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याचा मी प्रयत्न करणार आहे,’’ असे सिंह यांनी सांगितले.

ते म्हणाले की, ‘‘हे वर्ष खूप महत्त्वाचे असून नऊ खेळाडूंशिवाय आगामी स्पर्धामध्ये आणखी काही बॉक्सिंगपटू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरतील, असा विश्वास आहे.’’

एप्रिलमध्ये आशियाई बॉक्सिंग स्पर्धा

भारतात होणारी आशियाई बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धा एप्रिल किंवा मे महिन्यात खेळवण्यात येईल, अशी माहिती भारतीय बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनी दिली. गेल्या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणारी ही स्पर्धा करोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.