आयसीसी चॅम्पियन्स करंडक
‘करो या मरो’ अशा लढतीत श्रीलंकेने ऑस्ट्रेलियावर मात करत चॅम्पियन्स करंडक मालिकेच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहे. महेला जयवर्धने आणि लहिरु थिरिमाने यांच्या अर्धशतकांच्या बळावर श्रीलंकेला ऑस्ट्रेलियापुढे २५४ धावांचे आव्हान ठेवता आले.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कुशल परेरा आणि कुमार संगकाराला झटपट बाद करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी करणारा कुमार संगकारा ३ धावा करून बाद झाला. दिलशान आणि थिरिमाने यांनी तिसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत डाव सावरला. डोहर्टीने दिलशानला (३४) बाद केले. थिरिमानेने ४ चौकारांसह ५७ धावा केल्या. थिरिमाने बाद झाल्यानंतर जयवर्धनेने सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने चंडिमलसह सहाव्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी रचली. ३१ धावा करणाऱ्या चंडिमलला जॉन्सनने बाद केले. एका बाजूने सातत्याने विकेट्स पडत असतानाही जयवर्धनेने एकाकी झुंज दिली. त्याने ११ चौकारांसह ८१ चेंडूंत नाबाद ८४ धावा केल्या. जयवर्धनेच्या खेळीमुळेच श्रीलंकेने अडीचशेचा टप्पा ओलांडला. कर्णधार अँजेलो मॅथ्यूज या सामन्यातही फलंदाज म्हणून अपयशीच ठरला.
ऑस्ट्रेलियाला २५४ धावांचे आव्हान पेलता आले नाही. मालिकेत सुरुवातीपासूनच अपयशाचा पाढा सुरू ठेवणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाने यावेळीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट रसिकांना निराश केले. ऑस्ट्रेलिया संघाला श्रीलंकेच्या २५४ धावांचे लक्ष्य गाठता आले नाही आणि या पराभवाबरोबर चॅम्पियन्स करंडकातील ऑस्ट्रेलिया संघाचे आव्हानही संपुष्टात आले.
मालिकेच्या उपांत्य फेरीत आता श्रीलंकेचा भारताविरुद्ध सामना होणार आहे. मालिकेच्या सुरुवातीपासूनच उत्तम कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचे पारडे जरी जड असले, तरी या दोन संघांमध्ये अतितटीची लढत पहावयास मिळण्याची शक्यता आहे.