चढाया व पकडी या दोन्ही आघाडय़ांवर नियोजनबद्ध खेळ करत पाटणा पायरेट्सने गतविजेत्या जयपूर पिंक पँथर्सचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आणले. पायरेट्सने हा सामना २६-२४ असा जिंकत उपांत्य फेरीत स्थान मिळविले. उत्तरार्धात चुरशीने झालेल्या लढतीत बंगळुरू संघाने पुणेरी पलटण संघाला शेवट गोड करण्याच्या संधीपासून वंचित ठेवले. हा सामना त्यांनी ३१-३० असाजिंकला.
१२ व्या मिनिटाला पाटणा संघाने पहिला लोण नोंदविला. जयपूरच्या खेळाडूंनी केलेल्या चुकाही त्यांच्या पथ्यावर पडल्या. मध्यंतराला पाटणा संघाने १६-९ अशी आघाडी घेतली होती. ३० व्या मिनिटाला पाटणाकडे २१-१५ अशी आघाडी होती. तथापि राजेश नरेवालच्या बोनस गुणांवर जयपूरने बरोबरीसाठी आटोकाट प्रयत्न केले. शेवटच्या तीन मिनिटांत पाटणा संघाच्या खेळाडूंनी जसवीरसिंग व राजेश नरेवाल यांच्या पकडी केल्यामुळे बरोबरी करण्याच्या जयपूरच्या आशांवर पाणी फिरले. पाटणा संघाचा कोरियन खेळाडू तेक देओक ओम याने शानदार खेळ केला. उपांत्य फेरीत पाटणा संघाची यु मुंबा संघाशी गाठ पडणार आहे. उपांत्य फेरीच्या अन्य लढतीत तेलुगु टायटन्स संघापुढे बंगळुरू बुल्स संघाचे आव्हान असणार आहे.
मध्यंतराला बंगळुरू संघाने १९-१६ अशी आघाडी घेतली. त्यामध्ये त्यांच्या प्रकाश नरेवाल याने एकाच चढाईत घेतलेल्या तीन गुणांचाही महत्त्वाचा वाटा होता. ३७ व्या मिनिटाला २८-२८ अशी बरोबरी साधली. लागोपाठ दोन गुण मिळवित बंगळुरू संघाने ३०-२८ अशी आघाडी मिळविली. पुण्याच्या खेळाडूंनी मनजितची पकड केली मात्र आणखी एक गुण गमावला. त्यामुळे सामना बरोबरीत ठेवण्याची संधी पुण्यास साधता आली नाही.
spt01