नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील पदकविजेत्यांसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्रक्रिया यंदा लांबणीवर टाकण्यात येणार आहे.महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त २९ ऑगस्टला प्रत्येक वर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते देशातील सर्वोत्तम क्रीडापटूंना सन्मानित केले जाते. परंतु यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत ऑलिम्पिक स्पर्धा होणार असल्याने ही प्रक्रिया विलंबाने राबवण्यात येणार आहे.

‘‘यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांसाठी आमच्याकडे नियोजित तारखेपर्यंत बरीच नामांकने सादर करण्यात आली आहेत. त्यामुळे नामांकन प्रक्रिया संपलेली आहे. परंतु समितीच्या अखेरच्या बैठकीत आम्ही ऑलिम्पिक पदकविजेत्यांचा समावेश करण्याचे धोरण आखले आहे,’’ असे क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

ऑलिम्पिक स्पर्धा ८ ऑगस्टला संपेल. त्यानंतर निवड प्रकिया पूर्ण करण्यास घाई होणार असेल, तर पुरस्कार वितरण सोहळासुद्धा लांबणीवर पडू शकतो, असे संकेत सूत्रांनी दिले आहेत.

नेमबाजी पथकात आणखी दोन प्रशिक्षकांसाठी प्रयत्न

नवी दिल्ली : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पदाधिकाऱ्यांऐवजी आणखी दोन नेमबाजी प्रशिक्षकांचा पथकात समावेश करण्यासाठी भारतीय नेमबाजी संघटना प्रयत्नशील आहे. भारतीय नेमबाजी संघात याआधी सात प्रशिक्षकांचा समावेश करण्यात आला होता. ११ मे रोजी १३ ऑलिम्पिकपात्र नेमबाज (पिस्तुल आणि रायफल), सात प्रशिक्षक, पाच मानसतज्ज्ञ आणि दोन विश्लेषक झ्ॉग्रेब (क्रोएशिया) येथे स्पर्धा-वजा-सरावासाठी विशेष विमानाने रवाना झाले. या चमूत नंतर पॅव्हेल शिम्रोव्ह, समरेश जंग आणि रौनक पंडित सामील झाले आहेत.

ऑलिम्पिकबाबत जोकोव्हिचची द्विधा मन:स्थिती

विम्बल्डन : ऑस्ट्रेलियन, फ्रेंचपाठोपाठ विम्बल्डन टेनिस जेतेपदाला गवसणी घातल्यानंतर नोव्हाक जोकोव्हिचला ‘गोल्डन स्लॅम’ची संधी असली, तरी ऑलिम्पिकमध्ये सहभागाबाबत त्याला ५० टक्केच खात्री आहे.करोना साथीमुळे प्रेक्षकांचा अभाव आणि कडक निर्बंध या पार्श्वभूमीवर जोकोव्हिच टोक्योला रवाना होण्याची शक्यता कमी आहे. ‘‘ऑलिम्पिकबाबत मी नेहमीच उत्सुक असायचो. परंतु यंदा मात्र मी द्विधा मन:स्थितीत आहे. प्रेक्षक नसल्याचा निर्णय निराशाजनक आहे. त्यामुळे सहभागाबाबत पुनर्विचार करीन,’’ असे जोकोव्हिचने सांगितले. रॉजर फेडररनेही अद्याप निर्णय घेतलेला नाही. जर जोकोव्हिचने ऑलिम्पिक आणि अमेरिकन टेनिस स्पर्धा जिंकली, तर ‘गोल्डन स्लॅम’चा मान मिळवणारा तो पहिला पुरुष टेनिसपटू ठरेल. १९८८मध्ये स्टेफी ग्राफ या एकमेव महिला टेनिसपटूने हा मान मिळवला होता.

ऑलिम्पिकला करोनासह भूकंप, टायफूनचाही धोका

टोक्यो : टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेपुढे करोना साथीचे आव्हान ठाकले आहे. याव्यतिरिक्त ऑलिम्पिकला भूकंप, टायफून चक्रीवादळ या नैसर्गिक आपत्तींचाही धोका आहे. जपानमध्ये भूकंप आणि चक्रीवादळाचे आव्हान येथील नागरिकांना नेहमीच पेलावे लागते. परंतु करोना साथीमुळे आपत्ती व्यवस्थान यंत्रणेच्या तयारीवर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. २०१९मध्ये जपानला झालेल्या विश्वचषक रग्बी स्पर्धेदरम्यान टायफून चक्रीवादळामुळे १००हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे साखळीतील तीन सामने रद्द करावे लागले होते.