इंग्लिश प्रिमीअर लिग स्पर्धेत टोटॅनहम फुटबॉल क्लबचा खेळाडू डॅली अ‍ॅलीवर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. सोशल मीडियावर करोना विषाणूसंदर्भात वर्णद्वेषी पोस्ट केल्याबद्दल डॅलीवर ही कारवाई करण्यात आलेली आहे. डॅलीने आपल्या स्नॅपचॅट कन्वर्सेशनमध्ये करोना विषाणू आणि आशियाई व्यक्तींबद्दल एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या संभाषणाचे स्क्रिनशॉट ब्रिटनमधील एका वृत्तपत्राकडे गेल्यानंतर डॅलीवर कारवाई करण्यात आली आहे.

फुटबॉल असोसिएशनने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. १९ जूनरोजी टोटॅनहमचा इंग्लिश प्रिमीअर लिगमधील पहिल्या सामन्यात डॅली खेळू शकणार नाहीये. याव्यतिरीक्त डॅलीला ५० हजार पाऊंडचा दंडही भरावा लागणार आहे. डॅलीने हा प्रकार जाणूनबुजून केलेला नसला तरीही यामधून समाजातील एका गटाचा अपमान होईल असं वक्तव्य असल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात येत असल्याचं फुटबॉल असोसिएशनने स्पष्ट केलं.

फुटबॉल संघटनेचा निर्णय आल्यानंतर डॅलीने घडलेल्या प्रकाराबद्दल माफी मागितली आहे. आपल्या वागण्यामुळे क्लबची मान शरमेने खाली गेली याबद्दल मला खेद असल्याचं डॅलीने म्हटलंय. आपण केलेल्या कृत्याचं समर्थन करता येणं शक्य नसल्याचंही डॅलीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे.