नवे नियम, नवे संघ या समीकरणासह सुरू झालेल्या प्रीमिअर बॅडमिंटन लीग स्पर्धेत, दिल्ली एसर्स संघाने मुंबई रॉकेट्स संघाला नमवत पहिल्यावहिल्या जेतेपदाची कमाई केली. सिरी फोर्ट स्टेडियमवर रंगलेल्या अंतिम लढतीत, चाहत्यांच्या प्रचंड प्रतिसादात दिल्ली एसर्स संघाने ही लढत ४-३ अशी जिंकली. हुकमी लढतीत विजय मिळवणारा राजीव ओस्युफ दिल्लीच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
अंतिम लढतीत पहिल्या सामन्यात मुंबई रॉकेट्सच्या व्लादिमीर इव्हानोव्ह आणि कमिला जुहल जोडीने दिल्लीच्या अक्षय देवलकर आणि गॅब्रिएल अ‍ॅडकॉक जोडीवर १५-६, १५-९ असा विजय मिळवला. या विजयासह मुंबईने १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या लढतीत जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या दिल्लीच्या टॉमी सुगिआर्तोने मुंबईच्या एच. एस. प्रणॉयवर १३-१५, १५-९, १५-९ अशी मात केली. सुगिआर्तोच्या विजयासह दिल्लीने १-१ अशी बरोबरी केली. पुरुष दुहेरीच्या लढतीत दिल्लीच्या कू किट किआन आणि तान बून हूआंग जोडीने मुंबईच्या मॅथिअस बो आणि व्लादिमीर इव्हानोव्ह जोडीचा ११-१५, १५-१०, १५-१४ असा पराभव केला. या विजयाने दिल्लीने २-१ अशी आघाडी मिळवली. उपांत्य फेरीच्या लढतीत भारताची फुलराणी सायना नेहवालला पराभवाचा धक्का देणाऱ्या हान लि हिने मुंबईच्या हुकमी लढतीत दिल्लीच्या पी. सी. तुलसीला १२-१५, १५-८, १५-८ असे नमवले. हान लिच्या विजयामुळे मुंबईने ३-२ अशी आगेकूच केली. पुरुष एकेरीची लढत दिल्लीकरता हुकमी लढत होती. मात्र याचे दडपण न घेता शानदार फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीच्या राजीव ओस्युफने मुंबईच्या आरएमव्ही गुरुसाईदत्तवर १५-११, १५-६ अशी सहज मात करत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.