भेदक गोलंदाजी आणि दमदार फलंदाजीच्या जोरावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादला सात विकेट्स राखून पराभूत करत तिसरे स्थान पटकावले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या हैदराबादला दिल्लीने अमित मिश्रा व ख्रिस मॉरिसच्या अचूक माऱ्याच्या जोरावर १४६ धावांमध्ये रोखले. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला क्विंटन डी’कॉकने चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर संजू सॅमसन आणि रिषभ पंत यांनी संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीने नाणेफक जिंकत हैदराबादला फलंदाजीसाठी पाचारण केले आणि त्यांच्या सलामीवीरांनी त्याचा चांगला फायदा उचलला. डेव्हिड वॉर्नर आणि शिखर धवन (३४) यांनी संघाला नऊ षटकांमध्ये ६७ धावांची दमदार सलामी करून दिली. वॉर्नरने यावेळी धडाकेबाज खेळी साकारताना ३० चेंडूं्त सहा चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ४६ धावा केल्या. पण हे दोघेही बाद झाल्यावर हैदराबादच्या केन विल्यमसनचा (२७) अपवाद वगळता एकाही फलंदाजाला चांगली खेळी साकारता आली नाही. त्यानंतर पाच खेळाडूंना दोन अंकी धावसंख्याही गाठता आली नाही. दिल्लीकडून फिरकीपटू मिश्राने भेदक मारा करत चार षटकांमध्ये फक्त १९ धावा देत धवन आणि युवराज सिंग या दोन्ही डावखुऱ्या फलंदाजांना तंबूची वाट दाखवली.
हैदराबादच्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीला चौथ्याच षटकात पहिला धक्का बसला. पण त्यानंतर सलामीवीर क्विंटन डी’कॉकने दिल्लीचा डाव सावरला. त्याने ३१ चेंडूंत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ४१ धावा केल्या. डी’कॉक बाद झाल्याव दिल्लीचा डाव अचडणीच सापडेल असे वाटत होते. पण संजू सॅमसन (नाबाद ३४) आणि रिषभ पंत (नाबाद ३९) यांनी चौथ्या विकेटसाठी ७२ धावांची अभेद्य भागीदारी रचत संघाला विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक
सनरायझर्स हैदराबाद : २० षटकांत ८ बाद १४६ (डेव्हिड वॉर्नर ४६, शिखर धवन ३४; अमित मिश्रा २/१९, नॅथन कल्टर निले २/२५) पराभूत वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : १८.१ षटकांत ३ बाद १५० ( क्विंटन डी’कॉक ४१; मोइसेस हेनरिक्स २/१९)
सामनावीर : ख्रिस मॉरिस