सहा महिन्यांपूर्वी यूएईत खेळवण्यात आलेल्या आयपीएलच्या तेराव्या पर्वानंतर आता सर्वांना आयपीएलच्या नव्या पर्वाचे वेध लागले आहे. 9 एप्रिल ते 30 मे या कालावधीत आयपीएलचा चौदावा हंगाम खेळवण्यात येईल. या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. चेन्नई सुपर किंग्जने तर, प्रशिक्षणाला सुरुवातही केली आहे. मागील वर्षी उपविजेता राहिलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने नव्या हंगामासाठी नव्या जर्सीचे अनावरण केले आहे.

 

दिल्ली कॅपिटल्सने शुक्रवारी आपली नवीन जर्सी सर्वांसमोर आणली. फ्रेंचायझीच्या कार्यालयात जर्सीचे अनावरण करण्यात आले. यासाठी चाहत्यांनाही आमंत्रित केले होते. नवीन जर्सीमध्ये प्रामुख्याने गडद निळा आणि लाल रंग वापरण्यात आला आहे. जर्सीमधील वाघाच्या पट्ट्यांव्यतिरिक्त, त्यात दोन्ही बाजूंनी वाघांचे लाल रंगात पंजेदेखील आहेत.

दिल्लीचे सह-मालक किरण कुमार ग्रांधी म्हणाले, “दिल्लीतील चाहते संघाच्या यश-अपयशादरम्यान संघासमवेत राहिले. त्यामुळे त्यांना आम्हाला विशेष जाणीव करून द्यायची होती. जसे फोटोशूट आम्ही आमच्या खेळाडूंसोबत करतो तसेच आम्ही नव्या जर्सीसोबत काही चाहत्यांचे केले आहे. चाहत्यांना अविस्मरणीय अनुभव दिल्याबद्दल आम्ही आनंदी आहोत.”

दिल्ली कॅपिटल्सचे संचालक व हंगामी मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद बिश्त म्हणाले “नवीन जर्सी ट्रेंडी दिसते आणि आमच्या टीमशी जुळते. युवा संघ आव्हानासाठी तयार आहे.” आयपीएल 2021चा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात 9 एप्रिलला खेळवण्यात येईल. तर, दुसरा सामना 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जशी होईल.

मागील वर्षी दिल्लीचा संघ ठरला होता उपविजेता

आयपीएल 2020चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला गेला. दुबईच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांच्या वैयक्तिक अर्धशतकी खेळींच्या जोरावर मुंबई इंडियन्ससमोर १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. दिल्लीचे हे आव्हान मुंबईने ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. कर्णधार रोहित शर्माने ६८ धावांची खेळी केली. तर, इशान किशनने नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. मुंबईचे हे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले.