आयपीएलच्या आगामी पर्वाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असताना दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू अक्षर पटेल करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळला आहे. दिल्ली कॅपिटल्सने एएनआयला अक्षरबाबत वृत्त दिले.

 

9 एप्रिलला आयपीएलचा पहिला सामना खेळवण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिलला दिल्लीचा सामना चेन्नई सुपर किंग्जशी मुंबईत रंगणार आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये करोनाची लागण झालेला अक्षर हा दुसरा खेळाडू आहे. कोलकाता नाइट रायडर्सचा खेळाडू नितीश राणाला करोनाने ग्रासले होते. मात्र, त्यानंतर तो निगेटिव्ह आढळला. करोनाची लागण झाल्यानंतर अक्षरला क्वारंटाइन करण्यात आले आहे, असे फ्रेंचायझीने सांगितले.

बीसीसीआयच्या एसओपीनुसार, जे खेळाडू करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, त्यांना करोनाची चाचणी झाल्यापासून जैव सुरक्षित वातावरणाबाहेर 10 दिवसांसाठी वेगळे राहावे लागते. या कालावधीत खेळाडूला कोणताही व्यायाम न करता आराम करणे गरजेचे आहे. शिवाय, संघाचे डॉक्टर त्यांच्याबद्दल अपडेट घेत असतात. प्रकृती खालावली तर, खेळाडूला रुग्णालयात दाखल केले जाते.

वानखेडेतील ग्राऊंड्समॅन करोना पॉझिटिव्ह

अक्षरपूर्वी, वानखेडे स्टेडियममधील 8 ग्राऊंड्समॅन करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे मुंबईतील सामन्यांपूर्वी बीसीसीआयच्या चिंतेत वाढ झाली आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आगामी आयपीएल हंगामाचे 10 सामने रंगणार आहेत. 10 ते 25 एप्रिल दरम्यान हे सामने आयोजित करण्यात येतील. एका वृत्तसंस्थेच्या मते वानखेडे स्टेडियममधील सर्व 19 ग्राऊंडस्टाफ सदस्यांची आरटी-पीसीआर चाचणी गेल्या आठवड्यात झाली. 26 मार्च रोजी यातील 3 लोकांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यानंतर 1 एप्रिल रोजी, इतर 5 लोकांना संसर्ग झाल्याचे समोर आले.