वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडाच्या ‘यष्टीवेधी’ यॉर्करची चर्चा सध्या क्रिकेटजगतात ऐरणीवर आहे. सोमवारी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा हाच वेगवान मारा किंग्ज इलेव्हन पंजाबचे धडाकेबाज फलंदाज कशा प्रकारे सामना करतील, हे उत्सुकतेचे ठरणार आहे.

शनिवारी रात्री दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामना २० षटकांत १८५ या समान धावसंख्येमुळे ‘टाय’ झाला. त्यानंतर १२व्या पर्वातील ‘सुपर ओव्हर’चा थरार क्रिकेटरसिकांनी प्रथमच अनुभवला. परंतु रबाडाच्या भेदक यॉर्करच्या बळावर दिल्लीने ‘आयपीएल’च्या इतिहासातील १० ही नीचांकी धावसंख्या नोंदवूनही विजय मिळवला.

पंजाबकडे ख्रिस गेल, लोकेश राहुल, मयांक अगरवाल आणि डेव्हिड मिलरसारखे मातबर फलंदाज आहेत. परंतु दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने सर्वाचे लक्ष वेधले आहे. दोन्ही संघांनी शनिवारी विजय मिळवल्यामुळे त्यांचे आत्मविश्वास उंचावले आहेत. याशिवाय दोन्ही संघांच्या सलामीवीरांचे त्यांच्या विजयात महत्त्वाचे योगदान आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात दिल्लीच्या पृथ्वी शॉने ५५ चेंडूंत ९९ धावांची खेळी साकारली, तर मुंबई इंडियन्सविरुद्ध पंजाबच्या राहुलने ५७ चेंडूंत ७१ धावा केल्या.

पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या राहुलने संयमाने शानदार खेळी साकारली. याचप्रमाणे गेलने ४० आणि मयांकने ४३ धावा केल्या. त्यामुळे पंजाबने मुंबईचे १७७ धावांचे लक्ष्य आरामात पेलले. गेलच्या खेळीत चौकार आणि षटकारांची आतषबाजी होती.

पंजाबच्या वेगवान माऱ्याची मदार मोहम्मद शमीवर आहे. याशिवाय अँड्रय़ू टाय आणि हार्डस व्हिलजोएन यांचासुद्धा या माऱ्यात समावेश आहे. रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाखालील या संघाचे घरच्या मैदानावर पारडे जड मानले जात आहे.

कोलकाताचे विजयासाठी १८६ धावांचे लक्ष्य पेलताना पृथ्वीने दिमाखदार खेळी साकारली. परंतु अखेरच्या षटकात सहा धावा काढण्यात अपयशी ठरल्यामुळे हा सामना ‘सुपर ओव्हर’पर्यंत लांबला. मग रबाडाच्या यॉर्कर अस्त्रांच्या बळावर दिल्लीने कोलकाताला सहा चेंडूंत ७ धावांपर्यंत सीमित राखले.

दिल्लीकडे ऋषभ पंत हा भरवशाचा फलंदाज आहे. त्याने ७८ धावांची शानदार खेळी साकारल्यामुळे मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात दिल्लीला २१३ धावांचा डोंगर उभारता आला होता. याशिवाय शिखर धवन, कर्णधार श्रेयस अय्यर आणि कॉलिन इन्ग्राम यांच्यासारखे मातबर फलंदाज त्यांच्याकडे आहेत. याचप्रमाणे गोलंदाजीच्या फळीत रबाडाशिवाय न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा आणि अक्षर पटेल त्यांच्याकडे आहेत.

संघ

किंग्ज इलेव्हन पंजाब : रविचंद्रन अश्विन (कर्णधार), सॅम करण, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, निकोलस पूरन, मोझेस हेंड्रिक्स, हार्डस व्हिलजोएन, दर्शन नळकांडे, करुण नायर, सर्फराझ खान, अर्शदीप सिंग, अग्निवेश अयाची, हरप्रीत ब्रार,  ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, अँड्रय़ू टाय, लोकेश राहुल, अंकित राजपूत, मनदीप सिंग, सिमरन सिंग, मयांक अग्रवाल, मुजीब उर रहमान, डेव्हिड मिलर.

दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारू अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स.

  • सामन्याची वेळ : रात्री ८ वा.
  • थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १
  • स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १