भारतीय संघाच्या गोलंदाजीची धुरा ज्यांच्यावर अवलंबून राहणार आहे, त्या जसप्रीत बुमरा आणि अष्टपैलू हार्दिक पंडय़ा हे त्यांच्यावरील कामाच्या ताणाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करतात, त्यावर दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या पहिल्या लढतीसह मुंबई इंडियन्सच्या पुढील वाटचालीची दिशा स्पष्ट होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचा युवा संघ यंदा दमदार कामगिरीसाठी उत्सुक आहे.

गत सहा महिन्यांत पंडय़ाला दोन वेळा क्रिकेटपासून लांब राहावे लागले. गत सप्टेंबरमध्ये त्याच्या पाठदुखीने उचल खाल्ल्यामुळे प्रथम तर त्यानंतर वादग्रस्त वक्तव्य केल्याने त्याच्यावर दुसऱ्यांदा क्रिकेटपासून दूर राहण्याची वेळ आली होती. मुंबई संघाच्या संचालकपदी असलेल्या झहीर खाननेदेखील पंडय़ाच्या तंदुरुस्तीवर बारकाईने लक्ष ठेवून मगच सर्व निर्णय घेतले जाणार असल्याचे म्हटले आहे. मात्र सध्या तरी सर्व परिस्थिती नियंत्रणात असून तो चांगली कामगिरी बजावेल, असा विश्वास झहीरने व्यक्त केला. कर्णधार रोहित शर्मा यानेदेखील एकदिवसीय विश्वचषकासाठीच्या तंदुरुस्तीचा विचार डोक्यात ठेवूनच प्रत्येक खेळाडूने आपल्यावरील ताणाचा विचार करीत खेळणे किंवा न खेळण्याचा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक खेळाडूने आपले शरीर काय म्हणते, त्याकडे लक्ष देऊन खेळायला हवे, असेही रोहितने म्हटले आहे. मलिंगा हा प्रारंभीचे सहा सामने खेळू शकणार नसल्याने बुमराच्या ताणाचे व्यवस्थापन कसे केले जाते, त्यावरदेखील मुंबईच्या प्रारंभीच्या सामन्यांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

मुंबईने त्यांच्या चमूमध्ये युवराज सिंगचा समावेश केल्याने त्यांची फलंदाजी अधिकच भक्कम झाली आहे. किरोन पोलार्ड, बेन कटिंग आणि सूर्यकुमार यादव हे मधल्या फळीतील तडाखेबाज फलंदाज असल्याने मुंबईची मधली फळी अधिक भक्कम झाली आहे. तर गोलंदाजीच्या आघाडीवर बिरदर सरन, मिचेल मॅकलेनघन यांच्यासह कृणाल पंडय़ा, जयंत यादव आणि मयंक मरकडे यांच्यावर मुंबईची धुरा राहणार आहे.

दिल्ली डेअरडेव्हिल्सवरून दिल्ली कॅपिटल्स असे नामकरण झालेल्या या नवीन संघात शिखर धवनचा समावेश हे त्यांच्या फलंदाजीला बळकटी देणारे ठरणार आहे. तसेच श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्यासारख्या युवांसाठी ही अत्यंत चांगली संधी ठरणार आहे. दिल्लीकडे पृथ्वी शॉ, मनजोत कालरा तसेच कॉलीन मुनरो आणि ख्रिस मॉरिस यांची उपस्थितीदेखील जमेची बाजू राहणार आहे. तर ट्रेंट बोल्ट, इशांत शर्मा, कासिगो रबाडा आणि नाथू सिंग यांच्यासह गोलंदाजीदेखील दमदार असल्याने दिल्लीचा संघ मुंबईला तगडे आव्हान देऊ शकतो.

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, जेसन बेहरनडॉर्फ, जसप्रीत बुमरा, राहुल चहर, बेन कटिंग, पंकज जैस्वाल, इशान किशन, सिद्धेश लाड, एव्हिन लेविस, लसिथ मलिंगा, मयंक मरकडे, मिचेल मॅकलेनघन, अ‍ॅडम मिलाने, हार्दिक पंडय़ा, किरोन पोलार्ड, अनुकुल रॉय, रसिक सलाम, युवराज सिंग, अनमोलप्रीत सिंग, बिरदर सरन, आदित्य तारे, जयंत यादव, सूर्यकुमार यादव,क्विंटन डी कॉक.

दिल्ली कॅपिटल्स : कॉलिन इनग्राम, मनोज कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, श्रेयस अय्यर, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा, हर्षल पटेल, इशांत शर्मा, कासिगो रबाडा, नाथू सिंग, संदीप लमिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुनरा, हनुमा विहारी, जलज  सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स, रिषभ पंत.

सामन्याची वेळ : रात्री  ८ वा.