06 December 2019

News Flash

दिल्लीची विजयी घोडदौड रोखण्याचे राजस्थानसमोर आव्हान

दिल्लीने यंदाच्या हंगामात गृहमैदानापेक्षा प्रतिस्पध्र्याच्या मैदानांवर अधिक चांगली कामगिरी बजावली आहे.

नेतृत्वबदलाची मात्रा अचूक लागू पडल्यामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सला अखेर शनिवारी गृहमैदानावर विजयाचे दर्शन घडले. परंतु दिल्ली कॅपिटल्सची विजयी घोडदौड रोखणे स्टीव्ह स्मिथच्या राजस्थानसाठी सोमवारी आव्हानात्मक ठरू शकेल.

दिल्लीने यंदाच्या हंगामात गृहमैदानापेक्षा प्रतिस्पध्र्याच्या मैदानांवर अधिक चांगली कामगिरी बजावली आहे. परंतु शनिवारी फिरोझशाह कोटला स्टेडियमवर त्यांनी किंग्ज इलेव्हन पंजाबचा पाच गडी राखून पराभव करीत गृहमैदानावरील अनुकूलता सिद्ध केली. आता ‘आयपीएल’ गुणतालिकेत दिल्लीचा संघ १२ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

पराभवांच्या पाश्र्वभूमीवर राजस्थानने अजिंक्य रहाणेकडून कर्णधारपद काढून घेतले आणि ते स्मिथकडे सोपवले. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या लढतीत स्मिथने नेतृत्व सार्थकी ठरवत संघाला पाच गडय़ांनी विजय मिळवून देणारी खेळी साकारली. त्यामुळे मागील लढतींमधील विजयांसह दोन्ही संघांचा आत्मविश्वास उंचावला आहे. परंतु दिल्लीच्या तुलनेत राजस्थानला विजयाची अधिक आवश्यकता आहे. आतापर्यंत नऊ सामन्यांत तीन विजय मिळवणारा हा संघ गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानावर आहे. राजस्थानला सलामीवीर जोस बटलरची उणीव तीव्रतेने भासणार आहे.

अजिंक्य रहाणे धावांसाठी झगडत असून, त्याला नऊ सामन्यांत २३.६६च्या सरासरीने २१३ धावाच करता आल्या आहेत. त्यामुळे कर्णधारपद गमावणाऱ्या रहाणेला आता सलामीचे स्थानसुद्धा टिकवणे कठीण जाईल. राहुल त्रिपाठी हा सलामीसाठी पर्याय ठरू शकेल. पंजाबविरुद्ध त्रिपाठीने सलामीला उतरत ४५ चेंडूंत ५२ धावा साकारल्या, तर रहाणेने चौथ्या स्थानावर फलंदाजी करताना २१ चेंडूंत २६ धावा केल्या होत्या. परंतु पंजाबचे १८२ धावांचे आव्हान पेलताना राजस्थानला ७ बाद १७० धावाच करता आल्या होत्या.

कोपराच्या दुखापतीतून सावरलेल्या स्मिथला फलंदाजीचा सूरसुद्धा गवसला आहे. संजू सॅमसन आणि रयान पराग या युवा फलंदाजाची बॅटसुद्धा तळपू लागल्यास राजस्थानच्या बाद फेरीच्या अंधुक आशा जिवंत राहू शकतील. परंतु अखेरच्या षटकांमध्ये गोलंदाजी हा त्यांचा चिंतेचा विषय ठरत आहे. जोफ्रा आर्चर आणि लेगस्पिनर श्रेयस गोपाळ यांच्याशिवाय कोणत्याही गोलंदाजांमध्ये सातत्य दिसून येत नाही.

दिल्लीकडे त्या तुलनेत अधिक सक्षम फलंदाजीची फळी आहे. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरुविरुद्ध अनुभवी सलामीवीर शिखर धवनने ४१ चेंडूंत ५६ धावांची विजयाचा पाया रचणारी खेळी साकारली. मग कर्णधार श्रेयस अय्यरने ४९ चेंडूंत नाबाद ५८ धावांचे योगदान देत कळस चढवला. धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, अय्यर आणि कॉलिन इन्ग्राम अशा युवा आणि अनुभवी फलंदाजांचा योग्य भरणा त्यांच्याकडे आहे. अक्षर पटेलसुद्धा धावगती वाढवण्यात वाकबदार आहे.

दिल्लीच्या गोलंदाजीची प्रमुख धुरा कॅगिसो रबाडावर आहे. याशिवाय मध्यमगती गोलंदाज इशांत शर्मा, संदीप लॅमिछाने त्यांच्याकडे आहेत, तर फिरकी माऱ्याची जबाबदारी अमित मिश्रा आणि अक्षर सांभाळत आहेत.

संघ

  • राजस्थान रॉयल्स : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अजिंक्य रहाणे, जोफ्रा आर्चर, जोस बटलर, अ‍ॅश्टन टर्नर, ईश सोधी, ओशाने थॉमस, लिआम लिव्हिंगस्टोन, संजू सॅमसन, शुभम रांजणे, स्टुअर्ट बिन्नी, श्रेयस गोपाल, सुदेसन मिधून, जयदेव उनाडकट, प्रशांत चोप्रा, महिपाल लोमरो, आर्यमन बिर्ला, रियान पराग,मनन वोरा, धवल कुलकर्णी, कृष्णप्पा गौतम, वरुण आरोन, शशांक सिंग, राहुल त्रिपाठी.
  • दिल्ली कॅपिटल्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन इन्ग्राम, मनजोत कालरा, पृथ्वी शॉ, शेरफाने रुदरफोर्ड, शिखर धवन, अमित मिश्रा, आवेश खान, बंडारु अयप्पा, इशांत शर्मा, कॅगिसो रबाडा, नाथू सिंग, संदीप लामिछाने, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, ख्रिस मॉरिस, कॉलिन मुन्रो, हनुमा विहारी, जलाज सक्सेना, किमो पॉल, राहुल तेवतिया, अंकुश बेन्स, जगदीश सुचित.

सामन्याची वेळ: रात्री ८ वा.

थेट प्रक्षेपण: स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १

First Published on April 22, 2019 1:43 am

Web Title: delhi capitals vs rajasthan royals
Just Now!
X