‘मम्मी बॉल मिळाला का? संतुर साबणाची मनमोहित करणारी ही जाहिरात महिला सौंदर्याला अधोरेखित करते. सौंदर्य हा महिलेचा अलंकार असला तरी सध्याच्या घडीला सौंदर्यापलीकडे जाऊन महिला वेगवेगळ्या क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. त्याला खेळाचे मैदान अपवाद नाही. मातृत्वानंतर अनेक महिलांनी जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर मैदान गाजवल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच आशियाई बॉक्सिंग स्पर्धेत तीन मुलांची आई असणाऱ्या मेरी कोमनं सुवर्ण पदक पटकावून मातृत्वानंतर देखील महिलांतील ताकद कमी होत नाही, हे दाखवून दिलं. यापूर्वी टेनिस कोर्टच्या मैदानात बेल्जियमची स्टार टेनिसपटू किम क्लिस्टर्स हिने देखील मातृत्वानंतर मैदान गाजवले. मातृत्वानंतर तिने २००९ मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती. या टेनिस स्टारला सुपर मॉम म्हणून देखील ओळखले जाते. त्यानंतर आता नेहा तन्वर क्रिकेटच्या मैदानात मातृत्वानंतर नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाली आहे.

भारतीय महिला ‘अ’ संघ आणि बांगलादेश यांच्यात वनडे आणि टी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेत तब्बल तीन वर्षांनंतर नेहा तन्वर भारतीय संघात पुनरागमन करत आहे. मातृत्वानंतर वयाच्या ३१ व्या वर्षी क्रिकेटच्या मैदानात उतरणारी नेहा कदाचित पहिलीच भारतीय महिला असेल. २०११ मध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या नेहाचा क्रिकेटमधील प्रवास प्रेरणादायी असाच आहे. लग्नानंतर पती आणि सासरच्या मंडळींकडून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे तिचे क्रिकेटवरील प्रेम कायम राहिले. मात्र, २०१४ मध्ये कौटुंबिक जबाबदारीची जाणीव आणि मातृत्वाची ओढ यामुळे तिने क्रिकेटच्या मैदानातून काढता पाय घेतला. १४ फेब्रुवारी २०१४ या दिवशी दिल्लीच्या फिरोजशाह कोटला मैदानावर नेहाने अखेरचा सामना खेळला होता.

क्रिकेट मैदानातील पुनरागमनाच्या पार्श्वभूमीवर एका मुलाखतीमध्ये नेहा म्हणाली की, कुटुंबियांच्या पाठिंब्यामुळे मैदानात पुन्हा उतरणे शक्य झाले. मातृत्वानंतर महिलांचे दुसरे आयुष्य सुरु होते. शारीरिक बदलासोबत अनेक गोष्टींमध्ये बदल होतो. प्राधान्य क्रम देखील बदलावा लागतो. मात्र, काही गोष्टींपासून तुम्ही दूर राहू शकत नाही, असे सांगत क्रिकेटपासून दूर राहणे कठीण काळ होता, असे ती म्हणाली. तब्बल तीन वर्षांनंतर नेहा क्रिकेटच्या मैदानात उतरण्यास सज्ज झाली आहे. तब्बल २० किलो वजन कमी करण्यासाठी नेहाने कठोर मेहनत घेतली. क्रिकेटच्या पंढरी अर्थात लॉर्डसच्या मैदानात खेळण्याची तिची इच्छा आहे. अद्याप तिला ही संधी मिळालेली नाही. त्यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये हे ध्येय गाठण्याच्या इराद्यानेच ती मैदानात उतरेल.