News Flash

दिल्लीचा कोलकातावर विजय

करुण नायर, सॅम बिलिंग्जची अर्धशतकी खेळी ; कालरेस ब्रेथवेटची अष्टपैलू कामगिरी

कालरेस ब्रेथवेट

करुण नायर, सॅम बिलिंग्जची अर्धशतकी खेळी ; कालरेस ब्रेथवेटची अष्टपैलू कामगिरी
सुरेख सांघिक प्रदर्शनाच्या बळावर दिल्ली डेअरडेव्हिल्सने घरच्या मैदानावर कोलकाता नाइट रायडर्सला नमवत सरशी साधली. २ बाद २ अशी घसरण होऊनही दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना १८६ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर तुल्यबळ कोलकाता संघाला १५९ धावांमध्ये रोखत दिल्लीने विजय साजरा केला.
गौतम गंभीर आणि रॉबिन उथप्पा या कोलकाताच्या भरवशाच्या सलामीवीरांनी २१ धावांची सलामी दिली. मात्र झहीर खानने गंभीरला बाद करत ही जोडी फोडली. पीयूष चावलाला तिसऱ्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय फसला. चावला ८ धावा करून तंबूत परतला. कालरेस ब्रेथवेटने धडाकेबाज युसूफ पठाणलाही केवळ १० धावांवर बाद केले. श्रेयस अय्यरच्या अफलातून झेलमुळे सूर्यकुमार यादवला तंबूत परतावे लागले. त्याने २१ धावा केल्या. राजगोपाळ सतीशही ६ धावा करून माघारी परतला. एकामागोमाग एक सहकारी बाद होत असतानाही रॉबिन उथप्पाने चिवटपणे झुंज दिली. उथप्पाने आंद्रे रसेलच्या साथीने सहाव्या विकेटसाठी ३.३ षटकांत ४४ धावांची भागीदारी केली. अमित मिश्राने स्वत:च्याच गोलंदाजीवर अफलातून झेल टिपत रसेलचा झंझावात रोखला. रसेलने १२ चेंडूंत १७ धावा केल्या. चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात जेसन होल्डर भोपळाही फोडू शकला नाही. त्याच षटकांत मॉरिसने उथप्पाला बाद केले आणि कोलकाताच्या विजयाच्या आशा मावळल्या. उथप्पाने ५२ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ७२ धावांची खेळी साकारली. कोलकाताचा डाव १५९ धावांतच संपुष्टात आला. दिल्लीतर्फे झहीर खान आणि कालरेस ब्रेथवेट यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.
तत्पूर्वी दिल्लीने २ बाद २ अशा स्थितीतून १८६ धावांची मजल मारली. क्विंटन डी कॉकला आंद्रे रसेलने तिसऱ्याच चेंडूवर बाद झाले. श्रेयस अय्यर रसेलने भोपळाही फोडू दिला नाही. संजू सॅमसन आणि करुण नायर जोडीने ३० धावांची भागीदारी करत डाव सावरला. सुनील नरिनने सॅमसनला १५ धावांवर पायचीत केले. करुण नायरने पदार्पणवीर सॅम बिलिंग्जच्या साथीने चौथ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. उमेश यादवने नायरला बाद करत ही जोडी फोडली. नायरने ५० चेंडूंत ९ चौकार आणि एका षटकारासह ६८ धावांची खेळी केली. शेवटच्या लढतीत ८२ धावांची खेळी साकारणारा ख्रिस मॉरिसला उमेशने शून्यावरच बाद केले. इम्रान ताहीरच्या संघात संधी मिळालेल्या कालरेस ब्रेथवेटने ११ चेंडूंत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ३४ धावांची वेगवान खेळी केली. अर्धशतकानंतर लगेचच बिलिंग्ज बाद झाला. त्याने ३४ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांची खेळी साकारली. ब्रेथवेट आणि बिलिंग्ज जोडीने १२ चेंडूंत ३७ धावा फटकावल्या. कोलकातातर्फे आंद्रे रसेल आणि उमेश यादव यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. ३४ धावा आणि ३ विकेट्स अशी अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या कालरेस ब्रेथवेटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक
दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ८ बाद १८६ (करुण नायर ६८, सॅम बिलिंग्ज ५४, कालरेस ब्रेथवेट ३४; आंद्रे रसेल ३/२६, उमेश यादव ३/३३) विजयी विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स : १८.३ षटकांत सर्वबाद १५९ (रॉबिन उथप्पा ७२; झहीर खान ३/२१, कालरेस ब्रेथवेट ३/४७)
सामनावीर : कालरेस ब्रेथवेट

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2016 3:29 am

Web Title: delhi daredevils beat kolkata knight riders
Next Stories
1 विक्रमादित्य कुलकर्णी अजिंक्य
2 राहुल आवारे, फोगट भगिनींचे ऑलिम्पिक स्वप्न संपुष्टात
3 दिल्लीविरुद्ध पराभवाचे उट्टे फेडण्यासाठी कोलकाता उत्सुक
Just Now!
X