सॅमसनची अर्धशतकी खेळी; अमित मिश्राचा भेदक मारा

विजयासाठी १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सला दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्धच्या शेवटच्या षटकात २१ धावांची आवश्यकता होती. खेळपट्टीवर नांगर टाकून संयमी खेळी करणारा कर्णधार रोहित शर्मा खेळत होता. मात्र वेगाने धाव घेण्याच्या प्रयत्नात नाटय़मय पद्धतीने रोहित धावचीत झाला आणि ख्रिस मॉरिसने मुंबईला उर्वरित धावा करू दिल्या नाहीत. त्यामुळे दिल्लीने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली.

पार्थिव पटेल झटपट बाद झाल्यानंतर रोहित शर्मा आणि अंबाती रायुडूने ५३ धावांची भागीदारी केली. अमित मिश्राने रायुडूला बाद करत ही जोडी फोडली. कृणाल पंडय़ाने १७ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३६ धावांची वेगवान खेळी केली. मात्र चोरटी धाव घेण्याच्या नादात पंडय़ा बाद झाला आणि मुंबईची धावगती मंदावली. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध जोस बटलर (२) तर किरॉन पोलार्ड (१९) माघारी परतल्याने रोहितवरची जबाबदारी वाढली. शेवटच्या षटकात दुसरी धाव घेताना रोहित आणि हार्दिक पंडय़ा यांची टक्कर झाली. हार्दिकवर आदळल्याने रोहितला दुखापत झाली आणि त्याने रागाच्या भरात बॅट फेकली. रोहित धावचीत झाला आणि मुंबईच्या विजयाच्या आशा मावळल्या. त्याने ७ चौकार आणि एका षटकारासह ६५ धावांची खेळी केली. संथ खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उठवत दिल्लीच्या गोलंदाजांनी मुंबईला रोखत शानदार विजय मिळवला. अमित मिश्राने २४ धावांत २ बळी घेतले.

तत्पूर्वी, संथ आणि धिम्या खेळपट्टीवर दिल्लीने १६४ धावांची मजल मारली. शेवटच्या लढतीतील शतकवीर क्विंटन डी कॉकला मिचेल मॅक्क्लेनॅघनने ९ धावांवर बाद केले. श्रेयस अय्यर आणि संजू सॅमसन जोडीने दुसऱ्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. हार्दिक पंडय़ाने श्रेयसला बाद केले. हरभजन सिंगने करुण नायरला झटपट बाद केले. यानंतर सॅमसन आणि जे पी डय़ुमिनी जोडीने चौथ्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी करत संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मॅक्क्लेनॅघनने सॅमसनची खेळी संपुष्टात आणली. त्याने ४ चौकार आणि २ षटकारांसह ४८ चेंडूंत ६० धावा केल्या. डय़ुमिनीने पवन नेगीच्या साथीने ३.३ षटकांत ३९ धावा जोडल्या. डय़ुमिनीने ३१ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांसह ४९ धावांची खेळी केली.

संक्षिप्त धावफलक

दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १६४ (संजू सॅमसन ६०, जे पी डय़ुमिनी नाबाद ४९; मिचेल मॅक्क्लेनॅघन २/३१) विजयी विरुद्ध मुंबई इंडियन्स : २० षटकांत ७ बाद १५४ (रोहित शर्मा ६५, कृणाल पंडय़ा ३६; अमित मिश्रा २/२४)

सामनावीर : संजू सॅमसन