सनरायझर्स हैदराबादने शनिवारी आयपीएलच्या सामन्यात दिल्ली डेअरडेव्हिल्सवर ७ विकेट राखून विजय मिळवून बाद फेरीच्या दिशेने कूच केली आहे. मात्र, दिल्लीचे स्पध्रेतील आव्हान धोक्यात आले आहे. दिल्लीचे १६४ धावांचे लक्ष्य हैदराबादने ३ बळींच्या मोबदल्यात १९.५ षटकांत सहज पार केले.

मुंबईकर पृथ्वी शॉच्या फटकेबाजीच्या जोरावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्लीने निर्धारित २० षटकांत ५ बाद १६३ धावा केल्या. शॉने ३६ चेंडूंत ६५ धावांची खेळी करताना दिल्लीला पहिल्या दहा षटकांत ९५ धावा उभ्या करून दिल्या. मात्र, अखेरच्या दहा षटकांत त्यांना केवळ ६७ धावा जोडता आल्या. सलामीवीर ग्लेन मॅक्सवेल (२) दुसऱ्याच षटकात धावबाद झाला. मात्र, शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यर या मुंबईकरांनी दिल्लीला सावरले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ८६ धावांची भागिदारी केली. ६ चौकार व ३ षटकार खेचून ६५ धावा करणाऱ्या शॉला रशिद खानने बाद केले. ऋषभ पंतने तिसऱ्या विकेटसाठी अय्यरला साहाय्य केले, परंतु सिद्धार्थ कौलने अय्यरचा अडथळा दूर करत ही जोडी फोडली. अय्यरने ३६ चेंडूंत ३ चौकार व २ षटकार लगावत ४४ धावा केल्या. विजय शंकरने १३ चेंडूंत २३ धावा करताना दिल्लीला १६३ धावांपर्यंत मजल मारून दिली.

अ‍ॅलेक्स हेल्स आणि शिखर धवन या सलामीवीरांनी हैदराबादला आश्वासक सुरुवात करून दिली. दोघांनी साठेआठच्या सरासरीने ७६ धावांची सलामी दिली.  ३१ चेंडूंत ३ षटकार व ३ चौकार लगावत ४५ धावा करणाऱ्या हेल्सला अमित मिश्राने त्रिफळाचीत केले. पाठोपाठ ३३ धावा करणाऱ्या धवनचाही मिश्राने त्रिफळा उडवला. कर्णधार केन विल्यम्सन आणि मनिष पांडे यांनी संयमी खेळ केला. लियाम प्लंकेटने ४६ धावांची ही भागिदारी पांडेला (२१) बाद करून संपुष्टात आणली. त्यानंतर विल्यम्सनला यूसूफ पठाणने साजेशी साथ देताना हैदराबादच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

संक्षिप्त धावफलक  – दिल्ली डेअरडेव्हिल्स : ५ बाद १६३ (पृथ्वी शॉ ६५, श्रेयस अय्यर ४४, विजय शंकर नाबाद २३; रशिद खान २/२३) पराभूत वि. सनराझर्स हैदराबाद :  १९.५   षटकांत ३ बाद १६४  (अ‍ॅलेक्स हेल्स ४५, शिखर धवन ३३, केन विल्यम्सन नाबाद ३२, युसूफ पठाण नाबाद २७; अमित मिश्रा २/१९).

Updates :