सातत्याने कामगिरीत सुधारणा करत  दिल्ली डेअरडेव्हिल्सचा संघ शनिवारी आयपीएल विजेतेपदासाठी दावेदार मानला जाणाऱ्या कोलकाता नाइट रायडर्सला आव्हान देणार आहे. ईडन गार्डन्सवर कोलकाताने दिल्लीवर नऊ विकेट्स राखून विजय मिळवला होता. आता घरच्या मैदानावर त्या पराभवाचे उट्टे फेडण्याची जबाबदारी दिल्लीवर असणार आहे.

यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाची मागील वर्षीपेक्षा अधिक चांगली कामगिरी होत आहे. कोलकाताकडून पत्करलेल्या पराभवानंतर दिल्लीच्या संघाने सांघिक समतोल साधून बलाढय़ संघांना नामोहरम करण्याची इच्छाशक्ती मिळवली. मग त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यासारख्या संघांना पराभूत केले. गुजरात लायन्सविरुद्धच्या लढतीत ख्रिस मॉरिसने बेछूट फटकेबाजी करीत त्यांचे धाबे दणाणून सोडले होते. मात्र फक्त एका धावेने त्यांची हार झाली.

कोलकाताने सहा सामन्यांतील चार विजयांनिशी ८ गुण मिळवत गुणतालिकेत दुसरे स्थान राखले आहे.

दिल्लीचा कर्णधार झहीर खानने आपल्या गोलंदाजीत अधिक सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. क्विंटन डी’कॉक, जे पी डय़ुमिनी, करुण नायर आणि संजू सॅमसन यांच्यावर दिल्लीच्या फलंदाजीची मदार आहे. अमित मिश्रा हा एकमेव फिरकी गोलंदाज सर्व सामने खेळला आहे.

  • सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.
  • थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स/एचडी, सोनी सिक्स/एचडी.