अव्वल स्थानावरील हैदराबादशी आज सामना
अन्य स्पर्धाच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सची कामगिरी चांगली झाली असली तरी त्यांना बाद फेरीत पोहोचण्यासाठी उर्वरित दोन लढती जिंकाव्या लागणार आहेत. शुक्रवारी त्यांचा सामना अव्वल स्थानावर असलेल्या सनरायझर्स हैदराबादविरुद्धच होणार असून ही लढत त्यांच्यासाठी निर्णायक ठरणार आहे. कारण हा सामना गमावल्यास त्यांचे बाद फेरीत पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते. त्यामुळे हैदराबादविरुद्धचा सामना जिंकल्यास त्यांच्या बाद फेरीत पोहण्याच्या स्वप्नाला अधिक बळ मिळू शकते.
गेल्या सामन्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाकडून पराभव झाल्यामुळे दिल्लीवर आगामी दोन सामने जिंकण्याची वेळ आली आहे. आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये सहा विजयांसह दिल्लीचे १२ गुण असून ते सहाव्या स्थानावर आहेत. दुसरीकडे दमदार कामगिरी करत हैदराबादच्या संघाचे १६ गुण झाले आहेत. फलंदाजी हा दिल्लीच्या संघाचा कच्चा दुवा आहे. आतापर्यंत त्यांच्या संघातील एकाही फलंदाजाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. गेल्या सामन्यात करुण नायर आणि ख्रिस मॉरीस यांच्या खेळीच्या जोरावर संघाला शतकाची वेस ओलांडता आली होती. संघातील अन्य युवा खेळाडूंना मात्र छाप पाडता आलेली नाही. मयांक अगरवाल, श्रेयस अय्यर, संजी सॅमसन आणि रिषभ पंत यांच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. सर्वाधिक बोलीसह संघात दाखल केलेल्या अष्टपैलू पवन नेगीला अजूनही सूर गवसलेला दिसत नाही. दिल्लीच्या संघात बरेच प्रयोग पाहायला मिळाले आहेत आणि त्याचाच विपरीत परिणाम संघाच्या कामगिरीवर झालेला दिसतो. कर्णधार झहीर खानच्या नेतृत्वाखाली दिल्लीची गोलंदाजी चांगली होताना दिसत आहे, खासकरून फिरकीपटू अमित मिश्रा सातत्याने भेदक मारा करत आहे. पण त्यांना आतापर्यंत फलंदाजांची चांगली साथ मिळालेली नाही. फलंदाजांनी चांगली धावसंख्या उभारली तरी दिल्लीला विजय मिळवणे जास्त कठीण नसेल.
हैदराबादने सुरुवातीचे दोन सामने गमावले असले तरी त्यानंतर त्यांची कामगिरी चांगली झाली आहे, त्यामुळेच स्पर्धेत सर्वप्रथम त्यांनी १६ गुण मिळवले आहेत. डेव्हिड वॉर्नरने नेतृत्व करताना आपल्या फलंदाजीचा आदर्श संघाला घालून दिला आहे. शिखर धवन आणि संघात काही सामन्यांपूर्वी परतलेला युवराज सिंग यांना अपेक्षेनुरूप कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीमध्ये मुस्तफिझूर रेहमान, भुवनेश्वर कुमार आणि बरिंदर सरण यांच्याकडून अचूक मारा पाहायला मिळाला आहे. पण आशीष नेहरा दुखापतीमुळे उर्वरित हंगामात खेळू शकणार नसून हा हैदराबादसाठी एक धक्का असेल.

वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून.
प्रक्षेपण : सोनी सिक्स आणि सेट मॅक्सवर.

आशीष नेहराची माघार
स्नायूंच्या दुखापतीमुळे सनरायझर्स हैदराबादचा डावखुरा वेगवान गोलंदाज आशीष नेहराने आयपीएलमधून माघार घेतली आहे. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असून त्याच्या भविष्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.