फुटबॉल विश्वाचा मानबिंदू असलेल्या इंग्लिश प्रीमिअर लीग स्पर्धेत आता एक भारतीय रणरागिणी अवतरणार आहे. प्रदीर्घ वारसा लाभलेल्या या लीगच्या महिला प्रारूपात दिल्लीकर फुटबॉलपटू अदिती चौहान खेळणार आहे. वेस्ट हॅम क्लबने तिच्याशी करार केला असून, या स्पर्धेतील क्लबद्वारे करारबद्ध होणारी ती पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू आहे.
मलेशियात झालेल्या एएफसी पात्रता फेरी स्पर्धेत अदितीने भारताच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व केले होते. २०१३ मध्ये दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघाच्या महिला चषक स्पर्धेचे जेतेपद भारताला मिळवून देण्यात अदितीने निर्णायक भूमिका बजावली होती.
फुटबॉल संघटनेतील महिलांच्या प्रीमिअर लीगच्या दक्षिण विभाग वेस्ट हॅम तिसऱ्या दर्जाचा संघ आहे.
‘भारतीय फुटबॉलसाठी उत्साहवर्धक बातमी! वेस्ट हॅमने गोलरक्षक अदिती चौहानला करारबद्ध केले आहे,’ अशा शब्दांत वेस्ट हॅम संघव्यवस्थापनाने आपल्या भावना ट्विटर हँडलच्या माध्यमातून व्यक्त केल्या.
‘देशवासीयांच्या अमाप प्रेमाबद्दल मन:पूर्वक आभार. तुमच्या प्रतिसादाने भारावून गेले आहे. मिळालेल्या संधीचे सोने करण्यासाठी शंभर टक्के योगदान देण्याचा प्रयत्न करेन,’ अशा शब्दांत अदितीने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या.