आत्मविश्वास उंचावलेल्या दिल्लीने दुसऱ्यांदा विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आहे. मात्र त्यासाठी एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर सोमवारी त्यांना गुजरातचा अडथळा ओलांडावा लागणार आहे. २०१२-१३मध्ये एकमेव विजेतेपद काबीज करणाऱ्या दिल्लीला गुजरातचा फिरकी गोलंदाज अक्षर पटेलचा सामना करणे, ही अग्निपरीक्षा ठरणार आहे.

दिल्लीला शिखर धवनकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत आणि सध्या चालू असलेल्या हजारे करंडक स्पध्रेत धवन पुरेशा धावा काढू शकलेला नाही. मात्र आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर धवनला सूर गवसणे महत्त्वाचे मानले जात आहे. गुजरातची मदार यंदाच्या हंगामात १९ बळी घेणाऱ्या अक्षरवर आहे.

दिल्लीचा कर्णधार गौतम गंभीरचा इशांत शर्मा आणि पवन नेगी यांच्या गोलंदाजीवर भरवसा आहे. उन्मुक्त चंदने हिमाचल प्रदेशविरुद्धच्या उपांत्य सामन्यात नाबाद ८० धावा केल्या होत्या. पार्थिव पटेलच्या नेतृत्वाखालील गुजरातला सामोरे जाताना दिल्लीची धुरा धवन, गंभीर, चंद आणि इशांत यांच्यावर प्रामुख्याने असेल.

चिन्नास्वामी स्टेडियमवर उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीचे सामने खेळल्याचा अनुभव दिल्लीच्या पथ्यावर पडू शकेल. गुजरातचा संघ आपले बाद फेरीचे सामने अलूरला खेळला. गुजरातकडे अक्षर वगळता दिग्गज खेळाडूंचा भरणा नाही. अक्षरने गोलंदाजीप्रमाणेच आपल्या फलंदाजीचीही छाप पाडताना गुजरातकडून दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वाधिक २३३ धावा काढल्या आहेत. उपांत्य फेरीत गुजरातने तामिळनाडूला हरवले.

या सामन्यात अक्षरने ४३ धावांत ६ बळी घेण्याची किमया साधली. रुजूल भटच्या खात्यावर सर्वाधिक २७५ धावा आहेत. याशिवाय प्रियांक पांचाळ, चिराग गांधी आणि मनप्रीत जुनेजा यांच्याकडून गुजरातला अपेक्षा आहेत. तसेच जसप्रीत बुमराह आणि रूश कलारिया यांच्यावर त्यांच्या गोलंदाजीची मदार असेल