उन्मुक्त चमकला; हिमाचल पराभूत

उन्मुक्त चंदच्या शानदार खेळामुळेच दिल्ली संघाला विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठता आली. त्यांनी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशचा सहा विकेट्स राखून पराभव केला.

बिपुल शर्माने दमदार अर्धशतक झळकावूनही हिमाचल संघाला प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २०० धावांपर्यंतच मजल गाठता आली. दिल्ली संघाने विजयासाठी असलेले हे सोपे लक्ष्य ४१.१ षटकांमध्ये व चार फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. उन्मुक्तने नाबाद ८० धावा करीत त्यामध्ये मोठा वाटा उचलला. विजेतेपदासाठी दिल्ली संघाला गुजरातशी खेळावे लागणार आहे. हा सामना येथील चिन्नास्वामी स्टेडियमवर २८ डिसेंबर रोजी होणार आहे.

दिल्ली संघाच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा करीत हिमाचल संघाच्या फलंदाजांवर नियंत्रण ठेवले होते. प्रशांत चोप्रा (३३), पारस डोग्रा (२८) यांनी पहिल्या फळीत चमक दाखवली. मधल्या फळीत बिपुलने आक्रमक खेळ करीत ५१ धावा केल्या. दिल्लीकडून सुबोध भाटी व नितीश राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

उन्मुक्तने आश्वासक खेळ करताना शिखर धवनच्या साथीने ६१ धावांची भागीदारी करीत दिल्लीच्या विजयाचा पाया रचला. धवनने पाच चौकारांसह ३९ धावा केल्या. त्यानंतर दिल्लीकडून मोठी भागीदारी झाली नाही.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश : ५० षटकांत ९ बाद २०० ( बिपुल शर्मा ५१; सुबोध भाटी २/३६, नितीश राणा २/१६) पराभूत वि. दिल्ली : ४१.१ षटकांत ४ बाद २०१ (उन्मुक्त चंद नाबाद ८०, शिखर धवन ३९; निखिल गंगटा १/१४)

अक्षरचे सहा बळी; तामिळनाडूवर मात

पीटीआय, अलूर

अभिनव मुकुंदने नाबाद शतक करूनही तामिळनाडूला गुजरातविरुद्धच्या विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत ३१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. गुजरातचा अनुभवी फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने सहा बळी घेत विजयात सिंहाचा वाटा उचलला.

प्रथम फलंदाजी करताना गुजरातने ५० षटकांत ८ बाद २४८ धावांची मजल गाठली. त्यामध्ये चिराग गांधी व मनप्रीत जुनेजा यांनी केलेल्या तडाखेबाज अर्धशतकांचा मोठा वाटा होता. विजयासाठी २४९ धावांच्या आव्हानास सामोरे जाताना तामिळनाडूने बिनबाद ८४ अशी दमदार सुरुवात केली होती. मात्र अक्षरने अचूक टप्प्यावर मारा करीत त्यांचा डाव २१७ धावांमध्ये रोखला.

गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली होती. त्यांचा निम्मा संघ केवळ ८७ धावांमध्ये कोसळला. पण गांधी व जुनेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. गांधीने ७१  आणि जुनेजाने ७४ धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक

गुजरात : ५० षटकांत ८ बाद २४८ (चिराग गांधी ७१, मनप्रीत जुनेजा ७४ रविचंद्रन अश्विन ३/५१, विजय शंकर २/३६) विजयी वि. तामिळनाडू : ४७.३ षटकांत सर्वबाद २१७ (अभिनव मुकुंद नाबाद १०४, दिनेश कार्तिक ४१, रविचंद्रन अश्विन २२; अक्षर पटेल ६/४३, जसप्रीत बुमराह २/४५).