News Flash

सुशीलचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

प्रतिमा डागाळण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा दावा

प्रतिमा डागाळण्यासाठी षड्यंत्र रचल्याचा दावा

नवी दिल्ली : छत्रसाल स्टेडियमवरील हत्या आणि मारहाण प्रकरणी दोन ऑलिम्पिक पदके विजेता कुस्तीपटू सुशील कुमारने दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज मंगळवारी दिल्ली न्यायालयाने फेटाळला आहे. माझ्याविरोधातील चौकशी ही पक्षपाती असून, माझी प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आले आहे, असा दावा सुशीलने केला आहे.

छत्रसाल स्टेडियमवर ४ मेच्या रात्री झालेल्या मारहाणीच्या घटनेत २३ वर्षीय कनिष्ठ राष्ट्रीय विजेता कुस्तीपटू सागर राणाची हत्या झाली, तर सोनू आणि अमित कुमार जखमी झाले. या प्रकरणी सुशील आणि त्याच्या नऊ साथीदारांचा दिल्ली पोलिसांकडून शोध सुरू होता. सुशीलला पकडण्यासाठी पोलिसांनी एक लाखाचे रोख इनामसुद्धा जाहीर केले होते. हत्या, अपहरण आणि गुन्हेगारी कट अशा प्रकारचे आरोप सुशीलवर असल्यामुळे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जगदीश कुमार यांनी सुशीलचा जामीन नाकारला. आरोपीकडून मारहाणीचा पुरावा वकील अ‍ॅड. अतुल श्रीवास्तव यांनी सादर केला. सुशील परदेशी पलायन करण्याचा धोका असल्यामुळे त्याचे पारपत्र जप्त करावे, अशी मागणी श्रीवास्तव यांनी केली आहे.

अटकेच्या भीतीने सोमवारी सुशीलने दिल्लीमधील रोहिणी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज सादर केला. घटनेचे योग्य आणि खरे चित्र समोर येण्यासाठी मी चौकशी यंत्रणांना मदत करीन, असे सुशीलने यावेळी सांगितले. दिल्ली पोलिसांनी सुशील आणि त्याच्या साथीदारांवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, ३०८, ३६५, ३२३, ३४१, ५०६, १८८, २६९, १२०-बी आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

यासंदर्भात कोणताही ठोस पुरावा नसल्यामुळे कोठडीतल्या जाबजबाबाची आवश्यकता नाही. मारहाण आणि कथित गोळीबाराचा कोणताही संबंध नाही. घटनास्थळी सापडलेली बंदूक आणि गाडी माझी नाही.

-सुशील कुमार

सुशीलवर आरोप करणारी मंडळी ही गुन्हेगारी प्रवृत्तीची आहेत. त्याच्यावर द्वेषबुद्धीने करण्यात आलेल्या आरोपांचा हेतू त्याची प्रतीमा डागाळणे हाच आहे. हे सारे आरोप निराधार आणि हास्यास्पद आहेत. अशा प्रकारच्या बिनबुडाच्या आरोपांमुळे सुशील याला अपमानित केले जात आहे. सोनू या मारहाणीच्या घटनेत समाविष्ट होता. तो काला जठेरिया टोळीचा सदस्य असून, त्याच्यावर अनेक गुन्ह्य़ांची नोंद आहे.

-अ‍ॅड. सिद्धार्थ लुथ्रा (सुशीलचे वकील)

छत्रसाल हत्येप्रकरणी कटाची माहिती आणि शस्त्रे यांचा उलगडा होण्यासाठी कोठडीतील चौकशी आवश्यक आहे. या संपूर्ण घटनेत सुशील हा मुख्य आरोपी आहे. या गुन्ह्य़ातील त्याची भूमिका स्पष्ट करणारे पुरावे आमच्याकडे आहेत.

-दिनेश कुमार (पोलीस अधिकारी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 1:07 am

Web Title: delhi hc refuses to grant anticipatory bail to olympic wrestler sushil kumar in murder case zws 70
Next Stories
1 “२०११च्या वर्ल्डकपनंतर मला आणि माझ्या पत्नीला जीवे मारण्याची धमकी मिळाही होती”
2 क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरच्या वडिलांनी का सोडले घर?
3 BIG NEWS..! डिव्हिलियर्सच्या बाबतीत दक्षिण आफ्रिका क्रिकेटनं केला मोठा खुलासा
Just Now!
X