सुमित नरवाल (३/३५) याच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीने रणजी क्रिकेट सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव १९६ धावांत गुंडाळला. मात्र, त्यानंतर दिल्लीचीही ३ बाद ५९ अशी अवस्था झाली.
रोशनारा क्लबच्या मैदानावर शनिवारपासून सुरु झालेल्या या सामन्यात द्रुतगती गोलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दिल्लीच्या गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करीत महाराष्ट्राच्या फलंदाजांवर प्रभुत्व गाजविले. एक वेळ महाराष्ट्राची ६ बाद ८३ अशी स्थिती होती, मात्र अंकित बावणे (५८) व श्रीकांत मुंढे (४२) यांनी ६४ धावांची भागीदारी करीत संघाचा डाव सावरला. या दोन फलंदाजांनी १३ चौकार मारले. दिल्लीकडून नरवाल याने सर्वाधिक तीन बळी घेतले. उनमुक्त चंद व कर्णधार शिखर धवन यांच्यासह दिल्लीने तीन गडी गमावले. खेळ संपला त्या वेळी दिल्लीच्या २९ षटकांत ३ बाद ५९ धावा होत्या. मिथुन मनहास व वैभव रावल हे अनुक्रमे १२ व १६ धावांवर खेळत होते.
विराग आवटे व हर्षद खडीवाले यांनी महाराष्ट्राच्या डावाची सुरुवात केली. त्यांनी काही सुरेख फटके मारले, मात्र नरवाल याने झटपट दोन गडी बाद करीत महाराष्ट्राच्या डावास खिंडार पाडले. आवटे व खडीवाले हे अनुक्रमे १० व १५ धावांवर बाद झाले. संग्राम अतितकर हा भोपळा न फोडताच तंबूत परतला तर कर्णधार रोहित मोटवानी हा केवळ एका धावेवर बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचा डाव ४ बाद ३७ असा अडचणीत सापडला होता.
बावणे व केदार जाधव यांनी पाचव्या विकेटसाठी ३७ धावांची भर घातली. जाधवच्या पाठोपाठ चिराग खुराणा बाद झाल्यामुळे पुन्हा महाराष्ट्राचा डाव संकटात सापडला. तथापि बावणे व मुंढे यांनी शैलीदार खेळ करीत दिल्लीच्या प्रभावी माऱ्यास आत्मविश्वासाने तोंड दिले. बावणे याने शानदार अर्धशतक करताना सहा चौकारांसह ५८ धावा केल्या. मुंढे याने दमदार खेळ करीत सात चौकारांसह ४२ धावा केल्या. शेवटच्या फळीत अनुपम सकलेचा व समाद फल्लाह यांनीही थोडीशी फटकेबाजी करीत संघास जवळ जवळ दोनशे धावांपर्यंत पोहोचविले.
संक्षिप्त धावफलक-महाराष्ट्र पहिला डाव ५५.२ षटकांत सर्वबाद १९६ (अंकित बावणे ५८, श्रीकांत मुंढे ४२, सुमित नरवाल ३/३५)
दिल्ली पहिला डाव २९ षटकांत ३ बाद ५९ (वैभव रावल खेळत आहे १६, मिथुन मनहास खेळत आहे १२)