आनंद अमृतराज, माजी टेनिसपटू
डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेत प्ले ऑफच्या लढतीसाठी चेक प्रजासत्ताक भारतात खेळणार असल्याचे निश्चित झाल्यावर दिल्ली आणि पुणे या शहरांची निवड करण्यात आली होती. वातावरण आणि कोर्टचे स्वरूप लक्षात घेऊन दिल्लीला प्राधान्य देण्यात आले. चेक प्रजासत्ताकविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले असले, तरी दिल्लीची निवडच योग्य असल्याचे मत भारतीय संघाचे नॉन प्लेइंग कर्णधार आणि माजी टेनिसपटू आनंद अमृतराज यांनी व्यक्त केले. डेव्हिस चषकातील कामगिरी, युवा खेळाडू, दुहेरीवर असलेली भिस्त अशा विविध मुद्दय़ांवर अमृतराज यांनी लोकसत्ताशी केलेली बातचीत.
* अतिउष्ण आणि आद्र्रतापूर्ण वातावरण चेक प्रजासत्ताकच्या खेळाडूंना झेपणार नाही हे ध्यानात घेऊन डेव्हिस चषकाची लढत दिल्लीत आयोजित करण्यात आली. तरीही भारताला पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीची निवड करण्याचा निर्णय योग्य वाटतो?
हो. थंड वातावरणात खेळायची सवय असलेल्या चेकच्या खेळाडूंना या वातावरणाशी जुळवून घेणे कठीण जाईल असा विचार आम्ही केला. याव्यतिरिक्त दिल्लीतल्या आर. के. खन्ना स्टेडियमवरील कोर्टवर चेंडू अतिशय संथ गतीने येतो. उंचपुऱ्या आणि दमदार सव्‍‌र्हिससाठी प्रसिद्ध चेकच्या खेळाडूंना या कोर्टवर खेळताना अडचणी येतील अशी अपेक्षा होती. प्रतिस्पध्र्याची जमेची बाजू असलेल्या गोष्टी कमकुवत करण्याचा आमचा प्रयत्न होता. मात्र चिवटपणासाठी प्रसिद्ध चेकच्या खेळाडूंनी तळपता सूर्य आणि प्रचंड आद्र्रता यांची पर्वा न करता खेळ करत शानदार विजय मिळवला. दिल्लीत भारतीय संघाने त्यांना किमान टक्कर दिली. दुहेरीचा अपवाद वगळता अन्य तिन्ही लढतीत भारतीय खेळाडूंना संधी होती. दिल्लीऐवजी अन्य ठिकाणी लढत आयोजित केली असती तर चेक संघाने सहज विजय मिळवला असता.
* हमखास विजयाची खात्री असलेल्या दुहेरीच्या लढतीतील पराभवाने समीकरण बिघडले? आपण दुहेरीच्या जोडीवर अतिरिक्त अवलंबून आहोत?
दुहेरी हे आपले बलस्थान आहे. लिएण्डर आणि रोहनकडून विजयाचीच अपेक्षा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावर दुहेरीत ते शानदार कामगिरी करत आहेत. पण त्या दोघांना जोडी म्हणून एकत्र खेळताना विशेष प्रभावशाली कामगिरी करता आलेली नाही. या मुद्दय़ाकडे दुर्लक्ष करत त्यांच्या अनुभवाचा विचार करून विश्वास ठेवला. एकाच दिवशी या दोघांचीही कामगिरी इतकी खराब व्हावी हे दुर्दैव आहे. लिएण्डर-रोहन जोडीने विजय मिळवला असता तर चेक संघावर दडपण राहिले असते. दुहेरी प्रकारात आपण खात्रीपूर्वक विजय मिळवतो. लिएण्डर-रोहनऐवजी पुढच्या डेव्हिस चषक लढतीसाठी युवा खेळाडूंच्या नावाचा विचार होऊ शकतो.
* गेल्या वर्षभरातील डेव्हिस चषकातील भारतीय संघाच्या कामगिरीविषयी काय सांगाल?
विविध स्पर्धाच्या निमित्ताने जगाच्या विविध कानाकोपऱ्यातून डेव्हिस चषकासाठी भारतीय खेळाडू एकत्र येतात. वैयक्तिक खेळ असलेल्या टेनिसमध्ये संघासाठी खेळण्याचा दृष्टिकोन अंगीकारणे कठीण आहे. मात्र यासंदर्भात भारतीय संघातील एकी अपवादात्मक आहे. चांगली कामगिरी व्हावी यासाठी ते एकमेकांना प्रोत्साहन देतात, गुणदोषांवर चर्चा करतात. संघात कोणतीही गटबाजी नसून वातावरण खेळीमेळीचे असते. गेल्या वर्षभरात सर्बियाविरुद्ध भारतीय संघ पराभूत झाला तर न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवला. सर्बियासारख्या मातब्बर संघाला प्रत्येक विजयासाठी संघर्ष करावा लागला. युकीच्या प्रदर्शनात सातत्याने सुधारणा होते आहे. चेक संघाविरुद्ध पराभूत झाल्याने जागतिक गटात स्थान मिळवू शकलो नसलो तरी भारतीय संघाची कामगिरी निराशाजनक झालेली नाही.
* देशातील युवा खेळाडूंविषयी तुमचे काय मत आहे?
सध्याच्या घडीला युवा खेळाडूंची चांगली फौज तयार होते आहे. युकी भांब्री आणि सोमदेव देववर्मन आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थिरावले आहेत. साकेत मायनेनी, रामकुमार रामनाथन, जीवन नेंदूचेझियान हे सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत. जागतिक क्रमवारीत पाच गुणांनी आगेकूच करण्यासाठीही प्रचंड संघर्ष करावा लागतो. बहुतांशीवेळा पात्रता फेरीचा अडथळा ओलांडून मुख्य फेरी गाठण्यातच बरीचशी ऊर्जा खर्च होते. प्रवास अवघड आहे मात्र त्यांची वाटचाल योग्य दिशेने सुरू आहे.
* आयपीटीएल, चॅम्पियन्स टेनिस लीगसारख्या स्पर्धामध्ये खेळणे युवा खेळाडूंसाठी उपयुक्त आहे?
आयपीटीएलमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल दहा किंवा वीसमध्ये असणारे खेळाडूच खेळत आहेत. परंतु चॅम्पियन्स टेनिस लीगसारखी स्पर्धा युवा खेळाडूंना चांगले व्यासपीठ आहे. या स्पर्धेत
मोठय़ा प्रमाणावर भारतीय खेळाडू
सहभागी झाले होते. अनुभवी आंतरराष्ट्रीय खेळाडूंसह खेळण्याचा अनुभव मोलाचा ठरू शकतो.