आयपीएलमधील ‘स्पॉट-फिक्सिंग’चा पर्दाफाश केल्यानंतर यामधील पैशांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न दिल्ली पोलिसांनी सुरू केला आहे. यासाठी काही चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक केली असून त्यांनी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता आणि हैदराबाद या चार शहरांमध्ये तपास सत्र सुरू केले आहे. त्याचबरोबर फरिदाबाद येथील अजित चंडिलाच्या घरी पोलिसांनी दुसऱ्यांदा छापा टाकला. त्याचबरोबर या खेळाडूंची बँक खाती आणि त्यामध्ये होणाऱ्या आर्थिक उलाढालीही पोलीस तपासणार आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने शनिवारी दुसऱ्यांदा या तिन्ही आरोपींची एकत्रितपणे चौकशी केल्याचे समजते.
एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला यांना दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने मुंबईत विविध ठिकाणी अटक केली. त्यांच्यावर ‘स्पॉट-फिक्सिंग’प्रकरणी ६० लाखांपर्यंत लाच घेतल्याचा आरोप आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंडिलाला यापूर्वीच २० लाख रुपये मिळालेले आहेत, तर श्रीशांतला आगाऊ १० लाख रुपये त्याचा जवळचा मित्र जिजू जर्नादन याच्यामार्फत दिले होते. अटक झालेल्या जिजूने हे पैसे सट्टेबाजांकडून श्रीशांतला दिले होते. पण मुंबईविरुद्धच्या सामन्यानंतरच अंकितला अटक केल्यामुळे त्याच्या पैशांचा व्यवहार पूर्ण झालेला नाही.
श्रीशांतच्या विरोधात पुरावा सापडला का, असे विचारल्यावर दिल्लीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘श्रीशांतने कधीच थेट सट्टेबाजांशी संवाद साधलेला नाही. संवाद साधण्यासाठी तो जिजूच्या मोबाइलचा उपयोग करायचा आणि या संवादाचे पुरावे आमच्याकडे आहेत. जिजू हा श्रीशांतचा जवळचा मित्र नेहमीच त्याच्या सोबत असायचा. ते दोघेही एकत्र प्रवास करायचे आणि एकाच हॉटेलमध्ये वास्तव्य करायचे. आमच्याकडे श्रीशांतला आगाऊ पैसे कसे मिळाले, याचा ठोस पुरावाही आहे.’’
चंडिलाच्या घरी दोनदा पोलिसांनी छापे टाकले असले तरी श्रीशांत आणि अंकितच्या घरी ते सध्या तरी छापा टाकणार नसल्याचे कळते. सूत्रांनी सांगितले की, श्रीशांत आणि अंकित यांच्याविरोधात ठोस पुरावे आमच्याकडे असल्याने आतापर्यंत तरी त्यांच्या घरावर छापा न टाकण्याचे ठरवले आहे. गुरुवारी चंडिलाला अटक केल्यावर त्याच्या घरी छापा टाकण्यात आला होता, त्यानंतर शनिवारी दुसऱ्यांदा त्याच्या घरावर छापा टाकण्यात आला. पण यावेळी श्रीशांतचा मोठा भाऊ इस्पितळात असल्याने त्याच्या कुटुंबियांची चौकशी करता आली नाही. दिल्ली आणि मुंबई पोलिसांपाठोपाठ तामिळनाडूच्या पोलिसांनीही छापा टाकत चेन्नईतून सहा सट्टेबाजांना अटक केली असून त्यांच्याकडून १४ लाखांची रोख रक्कम जप्त केली आहे.
श्रीशांतसह अन्य दोन खेळाडूंनी आपल्यावरील आरोप मान्य केल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी केला होता. पण तिघांच्या वकिलांनी मात्र खेळाडूंना या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला आहे.