बीसीसीआय, आयपीएलमधील संघ आणि खेळाडूंमध्ये झालेले करार यासंदर्भात माहिती घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी बीसीसीआयचे माजी सचिव संजय जगदाळे आणि आयपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर रामन यांची भेट घेतली. स्पॉट-फिक्सिंग प्रकरणासंदर्भात इंडियन प्रीमिअर लीगचे अर्थकारण समजून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.
‘स्पॉट-फिक्सिंग’ प्रकरणी पकडण्यात आलेल्या एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या खेळाडूंनी कराराचा भंग केल्याची तक्रार राजस्थान रॉयल्सने दाखल केली आहे. त्यामुळेच बीसीसीआय, आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स हा संघ आणि संघाचे खेळाडू या त्रिपक्षांमध्ये झालेला करार समजून घेण्यासाठी दिल्ली पोलिसांनी जगदाळे यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. ‘‘जगदाळे यांना कोणत्याही चौकशीसाठी बोलावण्यात आलेले नाही.  आम्हाला त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. खेळाडू आणि राजस्थान रॉयल्सच्या पदाधिकाऱ्यांशी आम्ही बोललो असून आता आम्हाला बीसीसीआयची बाजू जाणून घ्यायची आहे,’’ असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.