वरिष्ठ राष्ट्रीय कॅरम स्पर्धा काही तासांवर येऊन ठेपली असताना सारे वातावरण तापलेले आहे. भारतीय कॅरम महासंघाने नियमांवर बोट ठेवून दिल्ली आणि उत्तरांचल या दोन्ही राज्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही, त्यांच्या खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना एकेरीमध्ये महासंघाच्या आधिपत्याखाली खेळता येईल, अशी भूमिका घेतली होती. या भूमिकेवर नाराजी प्रकट करीत दिल्ली राज्य संघटनेने महासंघाचा प्रस्ताव धुडकावला आहे. जर महासंघ खेळाडूंना दिल्लीच्या नावाखाली खेळायला देणार नसेल तर आमचे खेळाडू या स्पर्धेत खेळणार नाहीत, असा पवित्रा दिल्ली संघटनेने घेतला आहे. महासंघाच्या या निर्णयावर अन्य राज्य संघटनांनीही नाराजी व्यक्त केली असून स्पर्धेवर बहिष्कार घालायचा की नाही, हा निर्णय मंगळवारी सकाळी घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.
‘‘सब-ज्युनिअर आणि ज्युनिअर या दोन स्पर्धामध्ये सहभाग न घेतल्यास वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत राज्य संघटनांना सहभागी होता येत नाही, असा नियम आहे. सब-ज्युनिअर स्पर्धा कोलकात्यात पार पडली असली तरी ज्युनिअर स्पर्धा अजूनही झालेली नाही. ज्युनिअर स्पर्धा मार्चमध्ये होणार आहे, त्यापूर्वीच महासंघ असा निर्णय घेऊ शकत नाही. महासंघाने घेतलेला निर्णय आकसापोटी घेतलेला असून त्यामध्ये खेळाडूंचेच नुकसान होणार आहे. महासंघाने घेतलेला निर्णय नियमाला धरून नाही. महासंघ दिल्लीच्या खेळाडूंना ओळखणार कसे,’’ असा सवाल दिल्ली कॅरम संघटनेचे सचिन नारायण यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले, ‘‘राज्य संघटनाच खेळाडूंना स्पर्धेला नेत असते, इथे जर संघटनेला महासंघाने बंदी घातली असताना ते दिल्लीचे खेळाडू कोणते हे कोणत्या आधारावर ठरवणार, हा प्रश्न आहे. उत्तरांचल आणि राजस्थान या दोन्ही राज्यांमध्ये निवडणुका झालेल्या नाहीत. गेली बरीच वर्षे त्यांच्या राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय स्पर्धा झालेल्या नाहीत, मग त्यांनी या स्पर्धेला संघ कसा निवडला, हा देखील मोठा प्रश्न आहे. महासंघाने अट्टहास सोडला तरच आमचे खेळाडू स्पर्धेत सहभागी होतील.’’
‘‘महासंघाच्या धोरणावर अन्य संघटनाही नाराज आहेत. त्यामुळे या स्पर्धेवर बहिष्कार घालायचा का, यावर त्यांचे विचारविनिमय सुरू आहे. बहिष्कार घातल्यास खेळाडूंचे नुकसान होईल, त्यामुळे हा निर्णय पूर्ण विचार करूनच घेण्यात येईल,’’ असे सूत्रांनी सांगितले.