सायना नेहवालची विजयी घोडदौडसुद्धा हैदराबाद हॉटशॉट्सला तारू शकली नाही, हेच शनिवारी अधोरेखित झाले.
पहिल्या दोन्ही लढती गमावल्यानंतर दिल्ली स्मॅशर्स संघाने जोरदार मुसंडी मारत बलाढय़ हैदराबाद हॉटशॉट्स संघाला ३-२ असे नामोहरम केले आणि इंडियन बॅडमिंटन लीगमध्ये आपले आव्हान राखले.
हैदराबाद आणि दिल्ली ही लढत अखेपर्यंत रंगली. हैदराबादच्या तानानोंगसुक सेन्सोम्युनुक याने बी.साईप्रणीतवर १९-२१, २१-१९, २१-१९ अशी मात करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिली गेम त्याने गमावली, मात्र त्यानंतर त्याने शेवटपर्यंत चिवट खेळ करीत विजयश्री खेचून आणली. त्यापाठोपाठ सायना नेहवालने दिल्लीच्या अरुंधती पानतावणेवर २१-६, २१-८ असा दणदणीत विजय नोंदविताना आपल्या अव्वल दर्जाचा प्रत्यय घडविला. तिने केलेल्या स्मॅशिंगच्या वेगवान फटक्यांपुढे अरुंधती हिचा बचाव निष्प्रभ ठरला. हा सामना जिंकल्यामुळे हैदराबादला २-० अशी आघाडी मिळाली.
त्यानंतर मात्र सामन्याचे पारडे दिल्लीकडे झुकले. दिल्लीच्या कुन किओन कीत व तान वुंग होंग यांनी पुरुषांच्या दुहेरीतील सामन्यात तरुण कोना व गोह शिम यांच्यावर २१-१४, २१-२० अशी मात करीत दिल्लीचे आव्हान कायम राखले. पाठोपाठ डॅरेन लिऊ याने हैदराबादचा अनुभवी खेळाडू तौफिक हिदायत याच्यावर २१-१०, २१-७ असा सफाईदार विजय मिळविला आणि सामन्यात २-२ अशी बरोबरी केली.
मिश्र दुहेरीचा भरपूर अनुभव असलेल्या व्ही. दिजू याने प्राजक्ता सावंत हिच्या साथीने गोह शिम व प्रज्ञा गद्रे यांचा २१-२०, २१-१५ असा पराभव केला आणि दिल्लीला ३-२ अशी विजयश्री मिळवून दिली.