News Flash

परदेशी प्रशिक्षकाची मीराबाई चानूची मागणी

टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया लांबल्याचे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी स्पष्ट केले

संग्रहित छायाचित्र

 

माजी विश्वविजेती वेटलिफ्टर मीराबाई चानूने भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडे (साइ) दुखापतींबाबत मार्गदर्शन करू शकतील अशा परदेशी प्रशिक्षकाची मागणी केली आहे. ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम’ (टॉप्स) या योजनेअंतर्गत २५ वर्षीय मीराबाईने ही विनंती केली आहे.

मीराबाईला २०१८ मधील राष्ट्रकुल स्पर्धेनंतर पाठीच्या दुखापतीला सामोरे जावे लागले होते. ‘‘वेटलिफ्टिंगसारख्या खेळात अनेक वेळा दुखापतींना सामोरे जावे लागते. दुखापतींवर मात करण्याच्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन करतील, अशा प्रशिक्षकाची मला गरज आहे. जागतिक पातळीवर चांगली कामगिरी वेटलिफ्टर्सकडून होण्यासाठी यासारख्या प्रशिक्षकांची नितांत गरज आहे. शरीरातील छोटे स्नायू बळकट करण्यासाठीही हे प्रशिक्षक उपयोगी पडतात. मी या दृष्टीने टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीच मागणी केली होती. वेटलिफ्टर्सना नेहमी वजन उचलायचे असते, त्यामुळे दुखापती होण्याचा मोठा धोका असतो,’’ असे मीराबाईने सांगितले.

टाळेबंदीमुळे ही प्रक्रिया लांबल्याचे भारतीय वेटलिफ्टिंग महासंघाचे सरचिटणीस सहदेव यादव यांनी स्पष्ट केले. ‘‘मीराबाईची विनंती आम्ही ‘साइ’कडे पाठवली आहे. आमच्या संकेतस्थळावर यासंदर्भात जाहिरातही आम्हाला द्यावी लागेल. त्यानंतर उमेदवारांच्या मुलाखतीची प्रक्रिया सुरू होईल. त्यानंतरच मीराबाईसाठी परदेशी प्रशिक्षक नियुक्त करता येईल,’’ असे यादव यांनी स्पष्ट केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2020 3:04 am

Web Title: demand for foreign coach mirabai chanu abn 97
Next Stories
1 महिला, युवा विश्वचषकातील पात्रता सामने स्थगित
2 ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलला सुवर्ण
3 युवीचा ‘तो’ विक्रम कोण मोडणार? के एल राहुल म्हणतो…
Just Now!
X