राज्य कबड्डी निवडणूक

महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या निवडणुकीमधील दोन उमेदवारांनी राष्ट्रीय क्रीडा संहितेचा भंग केला आहे. त्यामुळे येत्या रविवारी होणारी निवडणूक स्थगित करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र माजी कबड्डीपटूंनी महाराष्ट्र आणि भारतीय कबड्डी संघटनेला दिले. त्यामुळे या निवडणुकीपुढील अडचणी वाढल्या आहेत.

राज्य कबड्डी संघटनेच्या एकूण १६ पदांसाठी २५ नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. याकरिता ७१ अर्ज दाखल झाले होते. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बऱ्याच जणांनी अर्ज मागे घेतल्यामुळे १३ जागांवर बिनविरोध निवड झाली. आता कार्याध्यक्ष आणि कोषाध्यक्ष अशा दोन पदांसाठी चार जण रिंगणात आहेत. यापैकी कार्याध्यक्षपदाची निवडणूक लढणाऱ्या गजानन कीर्तिकर आणि दत्ता पाथ्रीकर या दोघांबाबत या पत्रात आक्षेप नोंदवण्यात आला आहे. कीर्तिकर हे मुंबई उपनगर जिल्हा कबड्डी संघटनेचे अध्यक्ष आहेत, तर पाथ्रीकर हे औरंगाबाद कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.

या उमेदवारांपैकी बऱ्याच जणांनी दोन ते तीन कार्यकाळ पूर्ण केले आहेत. त्यामुळे ते या निवडणुकीसाठी अपात्र ठरतात. राष्ट्रीय क्रीडा संहितेनुसार कोणताही व्यक्ती जास्तीत जास्त १२ वष्रे एका पदावर कार्यरत राहू शकतो. प्रथमदर्शनी ही निवडणूक योग्य पद्धतीने होत नसल्याचे दिसून येत आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे पत्र केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड, भारतीय हौशी कबड्डी महासंघाचा कारभार पाहणारे प्रशासक, राज्याचे क्रीडामंत्री विनोद तावडे आणि महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेला पाठवण्यात आले आहे.