क्रिकेटला काळीमा फासणाऱ्या ‘आयपीएल स्पॉट फिक्सिंग’ प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी जनहित याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. एवढेच नव्हे, तर या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत ‘आयपीएल’च्या उर्वरित सामन्यांनाही स्थगिती देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
लखनौ येथील रहिवाशी सुदर्श अवस्थी यांच्या वतीने अ‍ॅड्. विष्णू जैन यांनी ही जनहित याचिका केली असून त्याने याचिकेमध्ये ‘आयपीएल’च्या सर्व फ्रन्चायजी, बीसीसीआय आणि केंद्र सरकारला प्रतिवादी केले आहे.

 ‘आयपीएल’मधील अनियमितता ही खेळाडूंचा लिलाव करण्याच्या प्रक्रियेपासूनच सुरू झाल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. ‘आयपीएल’मधील काळ्या पैशाची, प्रामुख्याने गुन्हेगारी जगताकडून त्यामध्ये गुंतविल्या जाणाऱ्या पैशांची चौकशी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे तपास पूर्ण होईपर्यंत ‘आयपीएल’च्या अंतिम सामन्यासह उर्वरित सामन्यांना स्थगिती देण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.